Pune: शहरात पादचाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ; चार पादचाऱ्यांना दुचाकीस्वार चोरांनी लुटले
By नितीश गोवंडे | Published: July 17, 2024 05:55 PM2024-07-17T17:55:29+5:302024-07-17T17:55:49+5:30
एका घटनेत तरुणाचा धमकावून मोबाईल काढून घेतला, तर तीन घटनांमध्ये महिलांचे मंगळसूत्र ओढून नेले
पुणे: शहरात पादचाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. स्वारगेट, बिबवेवाडी, मार्केटयार्ड भागात चोरट्यांनी पादचाऱ्यांकडील मोबाइल तसेच दागिने चोरून नेण्याच्या घटना घडल्या.
पहिल्या घटनेत गिरीधर भवन चौकात मंगळवारी (दि. १६) दुपारी सव्वा चारच्या सुमारास तरुणाला अडवून चोरट्यांनी त्याच्याकडील मोबाइल आणि कागदपत्रे चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत संजय तुकाराम कानगुडे (३४) याने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण कोथरूड भागातील रहिवासी आहे. तो मंगळवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास गिरीधर भवन चौकातून निघाला होता. त्यावेळी दोन चोरटे दुचाकीवरून आले. चोरट्यांनी त्याला अडवून धमकावले. तरूणाकडील १७ हजार रुपयांचा मोबाइल आणि कागदपत्रे ठेवलेली पिशवी चोरून नेली.
दुसऱ्या घटनेत स्वारगेट भागातील लक्ष्मीनारायण चौक, साबळे हाऊस ते कात्रज रोड परिसरात पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील १७ हजार ४०० रुपयांची सोनसाखली दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत इमलाबाई मगनलाल ओसवाल (७२, रा. शुक्रवार पेठ) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले करत आहेत.
तिसऱ्या घटनेत, अप्पर इंदिरानगर परिसरातील सुखसागरनगर भागात नवऱ्यासोबत शतपावली करत असलेल्या महिलेच्या गळ्यातील पावणेदोन लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. वैशाली सतिष गव्हाणे (४५, रा. सुखसागर नगर) यांनी याबाबत बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण काळोखे तपास करत आहेत. तर चौथ्या घटनेत, बिबवेवाडी परिसरात ५२ वर्षीय महिलेला पत्ता विचारून दुचाकीस्वार दोघे पुढे निघून गेले. त्यानंतर त्याच दुचाकीस्वारांनी पाठीमागून येत त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. याप्रकरणी संगिता गोविंद सलगरल (रा. बिबवेवाडी) यांनी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कांबळे करत आहेत.