शेतकऱ्याच्या हातात बळीचा नांगर, हे राज्यकर्त्यांनी कधी विसरू नये; सदाभाऊ खोत यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 02:45 PM2023-06-19T14:45:35+5:302023-06-19T14:46:26+5:30
सरकारने कष्टाळू,दयाळू व मायाळू शेतकऱ्याला झिटकारु नये, शेतक-यांच्या बाजूने जे सकारात्मक निर्णय घेतील त्यांचेच भविष्य उज्वल असेल
इंदापूर : शेतक-यांच्या बाजूने जे सकारात्मक निर्णय घेतील त्यांचेच भविष्य उज्वल असेल. सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने राहावे. कष्टाळू,दयाळू व मायाळू असणा-या शेतकऱ्याला जर झिटकारले तर शेतकऱ्याच्या हातात बळीचा नांगर आहे. हे राज्यकर्त्यांनी कधी विसरू नये, असा सज्जड इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी (दि.१८) वरकुटे बुद्रुक येथे बोलताना दिला.
शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने ते तेथे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, गाईच्या दुधाला ७५ रुपये तर म्हशीच्या दुधाला सव्वाशे रुपये भाव मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. ती मान्य झाल्यास महागाई निश्चितपणे कमी होईल. रयत क्रांती संघटनेने दि. २२ मे रोजी काढलेल्या यात्रेमध्ये दूध दरवाढीचा विषय आम्ही लावून धरला होता. त्याच्या अनुषंगाने दुधाच्या प्रश्नावर २२ जून रोजी पुण्यात दुग्धविकास मंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत १ हजार मिली दुधाला एका दारुच्या बाटलीचा भाव द्या, एवढीच साधी मागणी आपण करणार आहोत,असे ते म्हणाले.
यावेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात सन २०२२-२३ मध्ये गळीतास आलेल्या ऊसाची बिले तात्काळ द्यावीत. शेती तुकडेबंदी कायदा रद्द करावी. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे संपूर्ण वीज बिल माफ करावे. दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करावी. शेतकऱ्यांच्या पशुधनास १ रुपयात विमा लागू करावा या व इतर मागण्यांसदर्भात सदाभाऊ खोत यांनी मार्गदर्शन केले.
भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्यावर आंदोलनाचा इशारा
इंदापूरमधील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे देणे गरजेचे असताना ते दिले नाहीत. त्यामुळे गावगाड्यातील शेतकऱ्याला व त्याच्या पोरांना जागे करून दि.३० जून पर्यंत पैसे न दिल्यास दि. १ जुलै रोजी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या साखर कारखान्यासमोर आंदोलन करणार आहोत असा इशारा खोत यांनी दिला आहे.
'विच्छा माझी पूर्ण करा' चा पार्ट टू म्हणजे संजय राऊत
जोपर्यंत इच्छा असेल तोपर्यंत महाविकास आघाडीबरोबर राहू, त्यानंतर स्वतःच भगवा फडकवू, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सदाभाऊ खोत म्हणाले की, दादा कोंडकेंचे वगनाट्य होते ' विच्छा माझी पुरी करा' त्या वगनाट्याचा पार्ट टू म्हणजे संजय राऊत आहेत.