रविवार पेठेतील सराफी व्यावसायिकाचे दुकान लुटले; तब्बल साडेतीन कोटींची चोरी
By नम्रता फडणीस | Published: January 2, 2024 06:22 PM2024-01-02T18:22:54+5:302024-01-02T18:23:33+5:30
कामगारांपैकीच कुणीतरी दुकान व तिजोरीची बनावट चावी बनवून तिजोरीत ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरले
पुणे : रविवार पेठेत सराफी व्यावसायिकाचे दुकान लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या कामावर असलेल्या किंवा पूर्वी कामावर असलेल्या कामगारांपैकीच कुणीतरी दुकान व तिजोरीची बनावट चावी बनवून तिजोरीत
ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा मिळून ३ कोटी ३२ लाख ९ हजार २२८ रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याने फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सराफी व्यावसायिक दीपक माने यांनी फिर्याद दिली आहे. ३१ डिसेंबर रोजी रात्री ८ ते १ जानेवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रविवार पेठेत राज कास्टिंग नावाचे दुकान आहे. हे दुकान कुलूप लावून बंद होते. मात्र त्याच दुकानामध्ये सध्या कामासाठी असलेले किंवा यापूर्वी काम करीत असलेल्या कामगारांपैकी कुणीतरी कामगाराने फिर्यादी यांच्या दुकानाची व तिजोरीची बनावट चावी बनवून त्या चावीने दुकानाचा दरवाजा उघडत त्याद्वारे आत प्रवेश केला. दुकानामधील लोखंडी तिजोरी बनावट चावीने उघडून त्यात ठेवलेले १० लाख ९३ हजार २६० रुपये रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ३ कोटी ३२ लाख ९
हजार २२८ रुपयांचा ऐवज चोरला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड करीत आहेत.