Teachers Day 2023: फळ्याविना गळा घडविणारी शाळा! ना व्याकरण ना गणिताची आकडेमोड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 10:51 AM2023-09-05T10:51:29+5:302023-09-05T10:52:30+5:30
शिक्षणासह स्कूलबसही आहे मोफत...
- दिपक होमकर
पुणे :शाळा म्हणेज दप्तराचं ओझं, मराठी, हिंदी, गणित विज्ञान असे कुणाचे आवडीचे तर कुणाचे नावडीचे विषय पण सारे कंपल्सरी शिकावेच लागतात असं चित्र पुण्यासह अवघ्या भारतातल्या कोणत्याही शाळेत अगदीच ‘कॉमन’ आहे. पण या साऱ्या शाळांची संकल्पनाच बदलणारी एक शाळा पुण्यात सुरू झाली, या शाळेत ना भाषा विषयांचा अभ्यास ना गणिताची आकडेमोड. विषय आहे फक्त ‘संगीत’. विशेष म्हणजे या शाळेला एक रुपयाचा शुल्क नाही की वेगळ्या गणवेशाचा खर्च नाही. उलट शाळेत येण्या-जाण्यासाठी शाळेकडूनच स्कूलव्हॅनची मोफत सोय, महापालिकेच्या वतीने चालविली जाणारी अशी एकमवे शाळा आपल्या पुण्यात सुरू आहे. श्री संत तुकाराम महाराज संगीत कालाप्रबोधिनी असे या शाळेचे नाव.
२०१३ साली बाबा धुमाळ हे पुणे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी महापालिकेची ‘संगीत शाळा’ अशी अफलातून कल्पना मांडली. त्यासाठी महापालिकेच्या आणि पारंपरिक शिक्षणव्यवस्थेच्या रटाळ कारभाराकडे प्रचंड पाठपुरावा करत त्यांनी या शाळेसाठी पुण्यातील प्रभात रस्तासारख्या ‘क्रीम एरियात’ शाळेसाठी जागा उपलब्ध करून घेतली.
लाखांच्या घरात शिक्षण शुल्क घेणाऱ्या सिम्बॉयसीस शाळेच्या भल्या मोठ्या इमारतीला लागूनच महापालिकेचा शिक्षणरूपी ‘शारदेचा दरबार’ सुरू झाला आणि गेल्या दहा वर्षांपासून संगीत शिक्षणाची साधना सुरू झाली. पुण्यातील अनेक झोपडीपट्टीत या शिक्षणाचा प्रकाश पोहोचला आणि ज्यांना सुरपेटी व तबल्याला स्पर्श करणे हे सुद्धा एक स्वप्न होते त्या घरातील अनेक मुले आज प्रोफेशल आर्टिस्ट म्हणून पुण्यात संगीताचे कार्यक्रम आयोजित करायला लागले आहेत.
अशी आहे शाळेची प्रवेशप्रक्रिया
पुणे महापालिकेच्या कोणत्याही शाळेत शिकणाऱ्या मुलांनाच या ‘संगीत शाळेत’ प्रवेश दिला जातो. संबंधित महापालिकेच्या शिक्षकांकडून काही निवडक मुलांना या शाळेत ‘ऑडिशन टेस्ट’साठी पाठविण्यात येते. गायन, सुरपेटी आणि तबल्याचे काही प्राथमिक गोष्टी मुलाला शिकविल्या जातात, मुलाची आवड पाहिली जाते आणि त्यानुसार त्या मुलाचा या शाळेत प्रवेश निश्चित केला जातो. इयत्ता पाचवी ते आठवी या इयत्तेतील मुलांनाच या शाळेत प्रवेश दिला जातो.
मोफत शिक्षण अन् मोफत स्कूल व्हॅन
स्कूल बस, स्कूल व्हॅन ही संकल्पना झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांसाठी केवळ स्वप्नच असतं. कारण बड्या शाळांची स्कूल व्हॅनची फी तब्बल आठ-दहा हजारांच्या मात्र या शाळेतील मुलांसाठी स्कूल व्हॅन चक्क मोफत आहे. मुलांना ते शिकत असलेल्या शाळेपासून प्रभात रस्त्यावरील शाळेपर्यंत आणण्यासाठी व परत नेऊन सोडण्यासाठी महापालिकेने दोन स्कूल व्हॅन कंत्राटी पद्धतीवर घेतल्या आहेत. त्यासाठी खास निधी महापालिका शिक्षणमंडळाकडून दिला जातो. त्यामुळे शाळेच्या दोन शिफ्टमध्ये मुलांना शाळेत आणण्यासाठी व परत सोडण्यासाठी खास स्कूल व्हॅन मुलांना पुण्याच्या कानाकोपऱ्यातून शाळेपर्यंत आणते व पुन्हा नेऊन सोडते.