Pune Crime : अत्याचारासह सततच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलाने उचलले टोकाचे पाऊल
By नम्रता फडणीस | Published: November 26, 2024 03:56 PM2024-11-26T15:56:07+5:302024-11-26T15:56:07+5:30
याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली.
पुणे : लैंगिक अत्याचारासह सततच्या त्रासाला कंटाळून एका ५ वर्षीय शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो), तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
संकेत राजेश माेहिले (वय २६, रा. धम्मपाल संघाजवळ, ३१८ भवानी पेठ आणि मोहननगर, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मुलाच्या वडिलांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलगा आणि आरोपी संकेत मोहिले यांची ओळख होती. मुलगा दहावीत शिकत आहे. मोहिलेने मुलाला आमिष दाखवून वर्षभरापूर्वी तळजाई टेकडी परिसरात नेले. तेथे त्याने मुलाबरोबर अश्लील कृत्य, तसेच अनैसर्गिक अत्याचार केले. मोहिले याने मोबाइलवर छायाचित्रे काढली. त्यानंतर त्याने मुलाला धमकावण्यास सुरुवात केली. तो मुलाला सतत फोन करुन त्रास देत असे.
या त्रासामुळे मुलाने १५ नोव्हेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. चौकशीत मोहिलेने मुलावर अत्याचार करुन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे उघड झाले. त्यानंतर याप्रकरणी मोहिलेला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.