सुरक्षारक्षक परप्रांतीय, तो प्रतिभा काकींना ओळखत नव्हता; टेक्स्टटाईल पार्कच्या व्यवस्थापकाचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 03:09 PM2024-11-18T15:09:35+5:302024-11-18T15:10:36+5:30
प्रतिभा काकी येण्याची पूर्वकल्पना असती तर आम्ही स्वागताला थांबलो असतो, तसद्दी झाली असल्यास आम्ही क्षमा मागतो
बारामती: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाकडून माध्यमांना व्हिडीओ पाठविण्यात आला. त्यानंतर बारामती टेक्स्टटाईल पार्क चे व्यवस्थापक अनिल वाघ यांनी या घटनेबाबत खुलासा केला आहे.
वाघ म्हणाले, टेक्स्टईल पार्कचे हे प्रवेशद्वार मुळातच फक्त मालवाहतुकीसाठी आहे. येथून येणाऱ्या गाड्या मालवाहतुकीचे असतात. पार्कमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी दुसरे गेट उपलब्ध आहे. त्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक परप्रांतीय आहे. तो प्रतिभा काकी यांना ओळखत नव्हता. मात्र याबाबत मला समजल्या नंतर त्यांना तेथून पार्क मध्ये सोडण्याबाबत सूचना दिल्या. त्यानंतर प्रतिभाकाकी पार्कमध्ये आल्या. त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यामध्ये जाऊन महिलांशी संवाद साधला. तसेच खासदार सुप्रिया ताई सुळे, युगेंद्र पवार देखील नुकतेच पार्क मध्ये येऊन गेले आहेत. यापूर्वी प्रतिभाकाकी आणि रेवतीताई पार्क मध्ये येऊन गेल्या आहेत. त्यांचे आम्ही स्वागतच केले आहे. आज त्या येण्याची कोणतीही पूर्वकल्पना आम्हाला नव्हती. ती असती तर आम्ही स्वागताला थांबलो असतो. त्यांना काही तसद्दी झाली असल्यास आम्ही क्षमा मागतो,असे स्पष्टीकरण बारामती टेक्स्टटाईल पार्क चे व्यवस्थापक अनिल वाघ यांनी दिले आहे.
नेमकं काय घडलं?
बारामती टेक्स्टटाईलच्या समोरचा व्हिडिओ सुप्रिया सुळे यांच्याकडून आला होता. व्हिडीओमध्ये सिक्युरिटीने प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांची कार आल्यावर प्रवेशद्वार बंद केले. पार्कच्या सीईओंच्या सांगण्यावरून प्रवेशद्वार बंद केल्याचे सुरक्षारक्षक यामध्ये सांगत आहे. तसेच प्रतिभा पवार यांच्या भगिनी गीता जाधव यांनी या सुरक्षारक्षकाला प्रवेशद्वार उघडण्याबाबत सूचित केले. आमची गाडी पाहून पार्कचे प्रवेशद्वार बंद केले. आम्ही काय चोरी करायला आलेलो नाही, आम्हाला शाॅपिंग करायची असल्याचे सांगताना गीता जाधव दिसतात. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांनी शुक्रवारी (दि. १५) या पार्कला भेट देऊन येथील महिला कामगारांशी संवाद साधला होता.