Accident: पुण्यात रस्ता ओलांडताना बसच्या चाकाखाली येऊन ज्येष्ठ महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 21:23 IST2022-02-09T21:23:16+5:302022-02-09T21:23:40+5:30
बसचालक व वाहक यांना अपघात करणाऱ्या बससह पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Accident: पुण्यात रस्ता ओलांडताना बसच्या चाकाखाली येऊन ज्येष्ठ महिलेचा मृत्यू
येरवडा : विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर मुख्य चौकात बुधवारी दुपारी पीएमपीएल बसच्या मागील चाकाखाली आल्याने जेष्ठ महिलेचा जागीच मृत्यु झाला आहे. पदमा पंढरीनाथ गायकवाड (वय ७५, रा. गोल्डक्राफ्ट हाऊसिंग सोसायटी, चव्हाण चाळ, विश्रांतवाडी) मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पीएमपीएल बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विश्रांतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पदमा गायकवाड या बुधवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना विश्रांतवाडी चौकाकडून भोसरीकड़े जाणारी (एमएच १२, आरएन ७१०३) या बसच्या चाकाखाली आल्याने त्या काही अंतर फरफटत गेल्या. यामध्ये चाकाखाली चिरडल्या मुळे त्यांचा जागीच मृत्यु झाला. विश्रांतवाडी येथील चव्हाणचाळीत राहणाऱ्या गायकवाड यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे नागरिक हळहळ व्यक्त करत होते. विश्रांतवाडी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. बसचालक व वाहक यांना अपघात करणाऱ्या बससह पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास विश्रांतवाडी पोलिस करीत आहेत .