पुण्यातील धक्कादायक घटना! वडिलांसह शाळेत निघालेल्या चिमुकलीला कंटेनरने चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 11:16 AM2022-07-19T11:16:17+5:302022-07-19T14:54:45+5:30
घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु
हडपसर : हडपसर सासवड रोड सातववाडी येथे मुलीला शाळेत घेऊन जात असताना दुचाकी घसरून मुलगी व वडील दोघेही टँकर खाली आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत बाप लेकीचा मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यावर मुलगी गंभीर जखमी असताना नागरिकांनी तात्काळ तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तो पर्यंत तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही घटना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली, मुलीला शाळेत सोडत असताना बाप लेकीचा मृत्यू झाल्याची घटना क्षणभरात हडपसर परिसरात पसरली. घटनास्थळी हडपसर पोलीस व जीव रक्षक फाउंडेशनचे कार्यकर्त्यांनी मदत कार्य केले.
मीनाक्षी निलेश साळुंखे ( वय १० ), निलेश साळुंखे ( वय ३५ रा. ढमाळवाडी फुरसुंगी ) असे अपघातात मृत्यु झालेल्या बाप - लेकीचे नावं आहे. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितल्यानुसार, निखिल साळुंखे यांची मुलगी मीनाक्षी ही साधना शाळेमध्ये इयत्ता पाचवी वर्गामध्ये शिकत होती.
सकाळी सात वाजता शाळेला सोडायला वडील दुचाकीवरून जात असताना, सातववाडी येथे अपघात झाला. सातववाडी येथे सायकल ट्रॅक शेजारी कचरा कुंडी आहे. या कचरा कुंडी शेजारून पुढे जाणाऱ्या दुचाकीस्वाराने दुचाकी चालू अवस्थेत हातातील कचऱ्याची पिशवी कचराकुंडीत फेकली. त्यावेळी मागून येणारे निखिल साळुंखे गडबडले आणि चिखलावरून त्यांची दुचाकी घसरली. यामध्ये दोघेही बापलेकी पाठवून पाठीमागून येणाऱ्या टँकर खाली गेले. यामध्ये टँकरचे चाक वडिलांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागेचा मृत्यू झाला. तर मुलीचे डोके रस्त्यावर आपटल्याने ती गंभीर जखमी झाली होती. तिने वडिलांना पाहिले तेव्हा ती बाबा बाबा म्हणून ओरडली. तिला वाचवण्यासाठी नागरिकांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बापलेकीचा मृत्यू झाल्याची घटना क्षणात हडपसर परिसरामध्ये पसरली. घटना स्थळी हडपसर पोलिसांनी धाव घेऊन घटनेची माहिती जात आहे घेतली.