पुण्यातील धक्कादायक घटना! प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने सर्वांगावर वार करून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 14:51 IST2023-05-29T12:24:28+5:302023-05-29T14:51:40+5:30
प्रियकराला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता

पुण्यातील धक्कादायक घटना! प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने सर्वांगावर वार करून खून
वाघोली : प्रियकराशी झालेल्या वादातून महाविद्यालयीन युवतीने त्याच्यावर स्वयंपाक घरातील चाकूने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना वाघोली परिसरात घडली. प्रियकराच्या खोलीत अभ्यासासाठी गेलेल्या युवतीचा वाद झाल्यानंतर तिने प्रियकरावर चाकूने वार केले. प्रियकराशी झालेल्या झटापटीत महाविद्यालयीन युवती जखमी झाली.
यशवंत मुंडे (वय २२, मूळ रा. लातूर) असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. झटापटीत प्रेयसी अनुजा पन्हाळे (वय २१, रा. अहमदनगर) जखमी झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत आणि अनुजा वाघोली परिसरातील रायसोनी महाविद्यालयात विदा विज्ञान (डेटा सायन्स) अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. परीक्षा सुरू असल्याने दोघे एकत्रित अभ्यास करायचे. यशवंत रायसोनी महाविद्यालयाजवळ भाडेतत्वावर खोली घेऊन राहत होता. रविवारी रात्री अनुजा त्याचा खोलीवर अभ्यास करण्यासाठी गेली होती.
सोमवारी पहाटे यशवंत आणि अनुजा यांच्यात वाद झाला. त्या वेळी तिने स्वयंपाकघरातील भाजी कापण्याच्या चाकूने यशवंतवर वार केले. झटापटीत अनुजाला दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या यशवंतला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
''यशवंत आणि अनुजा यांच्यात प्रेमसंबंध होते. परीक्षा सुरू असल्याने ती यशवंतच्या खोलीवर अभ्यासासाठी गेली होती. त्या वेळी त्यांच्यात वाद झाली. तिने स्वयंपाकघरातील भाजी कापण्याच्या चाकूने त्याच्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या यशवंतचा मृत्यू झाला. झटापटीत अनुजा जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. - गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे''