बँका लुटण्याचा धक्कादायक प्रकार; एटीएमशी छेडछाड करून लाखो रुपयांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 12:59 PM2023-01-29T12:59:55+5:302023-01-29T13:06:16+5:30
वीज खंडित करून काढले जातात पैसे : राज्यात ६० ठिकाणी घडला प्रकार
विवेक भुसे
पुणे : आपण एटीएममधून पैसे काढतो, तेव्हा तातडीने आपल्याला मेसेज येतो. त्यानंतर मशीनमधून पैसे येतात. या काही क्षणाच्या कालावधीत मशीनचा वीज पुरवठा बंद करून दोघा चोरट्यांनी एका बॅंकेच्या एटीएम सेंटरमधून पैसे काढून लाखो रुपये लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. हे चोरटे बँकेच्या यंत्रणेशी संबंधित असल्याचा पोलिसांना संशय आहे. पुण्यात दोन घटनांमध्ये दोन लाखांना गंडा घातला गेला. राज्यभरात अशा प्रकारे ६० गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याप्रकरणी आरबीएल बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीनुसार दोघा चोरट्याने दिवसभरात १३ व्यवहार करून १ लाख २४ हजार रुपये काढले आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी फसवणूक केली आहे. अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी याच चोरट्यांनी बंडगार्डन रोडवरील पी.टी. गेरा सेंटर येथील आर.बी.एल बँकेच्या एटीएम मशीनमधूनही नऊ व्यवहार करून ७८ हजार ५०० रुपये काढून फसवणूक केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही चोरटे बँकेच्या एटीएम सिस्टमचे चांगले माहीतगार असावेत. अशा प्रकारे राज्यभरात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड वापरले आहेत. त्यांनी ज्या कार्डवरून हे पैसे काढले, त्याची माहिती घेतली जात आहे.
व्हिजिलन्स पथकाकडून अलर्ट
बाणेर रोड येथील आरबीएल बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये त्याच दिवशी ५ ऑक्टोबरला दुपारी १ वाजून ३७ मिनिटांपासून रात्री ११ वाजून ४३ मिनिटे या काळात दोन चोरट्यांनी एटीएम मशीनच्या वीज पुरवठ्याचे बटन बंद करून पुन्हा सुरू केले. एकूण १३ व्यवहार केले. त्याद्वारे एकूण १ लाख २४ हजार रुपये काढले आहेत. याबाबत काही दिवसांनी बँकेच्या व्हिजिलन्स पथकाला या व्यवहाराची माहिती समजली. त्यानंतर त्यांनी संबंधित बँकेच्या शाखेला ई-मेलद्वारे माहिती दिली. त्यानंतर डिसेंबरमध्ये याबाबत पुण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा याबाबत आमच्या व्हिजिलन्स पथकाकडून माहिती मिळाली असून, त्यांच्याकडून फिर्याद देण्यास सांगितल्याने आम्ही दिली, असे सांगितले.
लोकांनी राहावे दक्ष
एटीएम सेंटरमध्ये शिरून कोणी मशीनशी छेडछाड करीत असेल तर लोकांनी तत्काळ पोलिसांना कळवावे.
एटीएम मशीनच्या यंत्रणेवरच हल्ला
या चोरट्यांनी एटीएम मशीनच्या यंत्रणेवरच जणू हल्ला केला आहे. बँकेच्या वतीने दिलेल्या फिर्यादीत घडलेला प्रकार पाहता यापुढे बाहेरून कोणाला एटीएम मशीनचा वीज पुरवठा बंद करता येणार नाही, अशी सोय करावी लागणार आहे.