‘इथे मराठी माणसं राहत होती’अशी पाटी लावावी लागेल;हिंदीच्या सक्तीविरोधात मनसेचा हल्लाबोल
By राजू इनामदार | Updated: April 18, 2025 20:22 IST2025-04-18T20:20:12+5:302025-04-18T20:22:02+5:30
हिंदी ही संपर्कसुत्र म्हणून देशाची भाषा आहे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मताचाही निषेध करण्यात आला.

‘इथे मराठी माणसं राहत होती’अशी पाटी लावावी लागेल;हिंदीच्या सक्तीविरोधात मनसेचा हल्लाबोल
पुणे : शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने संबंधित अध्यादेश जाळून निषेध व्यक्त केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही सक्ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिल्यानंतर हे आंदोलन करण्यात आले.
झाशीची राणी चौकात या अध्यादेशाची होळी करण्यात आली. हा शासन निर्णय म्हणजे मराठीचे खच्चीकरण करून मराठी भाषेचे अस्तित्व संपविण्याचा शासनाचा घाट आहे, उद्या काही दशकानंतर ‘इथे मराठी माणसं राहत होती’, अशी पाटी लावावी लागेल. मराठी अस्ताची सुरुवात या मराठी द्रोही सरकारी निर्णयानुसार होईल, अशी टीका करण्यात आली. हिंदी ही संपर्कसुत्र म्हणून देशाची भाषा आहे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मताचाही निषेध करण्यात आला.
मनविसेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांनी सांगितले की, इतक्या लहान वयात विद्यार्थ्यांवर तीन तीन भाषांची सक्ती करण्याआधी सरकारने तज्ज्ञांचा विचार घ्यायला हवा होता. तसे न करता केंद्र सरकार ही बळजबरी करत आहे व राज्य सरकार त्याला मान्यता देत आहे. हिंमत असेल तर राज्य सरकारने केंद्र सरकारला, इथे हे चालणार नाही, असे खडसावून सांगावे. आंदोलनाची दखल घेतली नाही तर पुण्यात हिंदी भाषेचे एकही शालेय पुस्तक आणू दिले जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. प्रशांत कनोजिया, ॲड. सचिन पवार, नरेंद्र तांबोळी, सुनील कदम, अभिषेक भाई थिटे, रुपेश घोलप, सारंग सराफ, विक्रांत भिलारे, परिक्षित शिरोळे, ॲड. सचिन ननावरे, केतन डोंगरे, नीलेश जोरी, आशुतोष माने, अशोक पवार, शशांक अमराळे, हेमंत बोळगे, संतोष वरे आंदोलनात सहभागी झाले होते.