सरकारने लाडका गुन्हेगार योजना सुरू केल्याचं लक्षण; पाटील - मारणेच्या भेटीनंतर रोहित पवारांचा सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 04:59 PM2024-08-30T16:59:51+5:302024-08-30T17:00:36+5:30
गुंडांना राजाश्रय देण्याच्या भाजपच्या कृत्यामुळं दहशतीखाली असलेली सामान्य जनताच आपल्याला योग्य वेळी चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही
पुणे: मंगळवारी गोकुळाष्टमी पार पडली. यांनिमित्ताने राज्यभरात दहीहंडी फुटल्या तशाच त्या पुण्यातही फुटल्या. भाजपचे नेते आणि सध्या कोथरूडचे आमदार असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघातही दहीहंडी होती. आणि यातील एक दहीहंडी गुंड गजानन मारणेची होती. दहीहंडीला हजेरी चक्क चंद्रकांत पाटलांनी हजेरी लावली होत. यावेळी त्यांनी या गजानन मारणेच्या हस्ते सत्कार स्वीकारला. फोटोसाठी छान अशी पोजही दिली. आणि शेवटी या दोघांनी एकमेकांना हातही जोडले. त्यानंतर चंद्रकांत पाटलांवर विरोधकांकडून टिक होऊ लागली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीसुद्धा या प्रकरणानंतर भाजप सरकारवर ट्विट करत निशाणा साधला आहे.
मंत्र्यांनी गुन्हेगारांना सोबत घेऊन फिरणं म्हणजे या सरकारने लाडका गुन्हेगार योजना सुरू केल्याचं लक्षण आहे, परंतु विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारांच्या मदतीने जिंकण्याची स्वप्न पाहणाऱ्यांनी हा महाराष्ट्र आहे हे मात्र विसरू नये असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. देवेंद्र फडणवीस साहेब तुमचे खासदार पोलिसांना धमक्या देतात, पत्रकारांना धक्काबुक्की करतात, मंत्री गुंडांना भेटतात यालाच पार्टी_विथ_डीफरन्स म्हणायचं का? आपल्या याच आदरातिथ्यामुळं गुंडाचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला असून गुन्हेगारी वाऱ्याच्या वेगाने फोफावत चाललीय. गुंडांना राजाश्रय देण्याच्या आपल्या कृत्यामुळं दहशतीखाली असलेली सामान्य जनताच आपल्याला योग्य वेळी चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असे ट्विटर वरून सांगितले आहे.
मंत्र्यांनी गुन्हेगारांना सोबत घेऊन फिरणं म्हणजे या सरकारने #लाडका_गुन्हेगार_योजना सुरू केल्याचं लक्षण आहे, परंतु विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारांच्या मदतीने जिंकण्याची स्वप्न पाहणाऱ्यांनी हा #महाराष्ट्र आहे हे मात्र विसरू नये.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 29, 2024
असो! @Dev_Fadnavis साहेब तुमचे खासदार पोलिसांना… pic.twitter.com/k9y5ICGCqZ
खरंतर गजानन मारणे गुंड आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जेव्हा पुण्यात पदभार स्वीकारला तेव्हा त्यांनी पुण्यातील सर्वच गुंडांची त्यांनी परेड काढली होती. त्यात अग्रभागी गजानन मारणे होता. त्यावेळी तो पोलिसांसमोर हात जोडून उभा होता. आणि त्याच गुंडासमोर आता भाजपचे प्रभावी नेते असलेल्या चंद्रकांत पाटलांनी हात जोडल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. खर तर याआधी अनेक राजकारणी गजानन मारणेच्या भेटीसाठी त्याच्या घरी गेले होते. यामध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांचा समावेश आहे. मात्र आता पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील गजानन मारणेसमोर हात जोडून उभे असल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अवघ्या काही महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आहे. चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा कोथरूड मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यापूर्वीच या दोघांच्या भेटीचा हा व्हिडिओ समोर आल्याने विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत सापडले आहे.