शेकडो सापांना जीवदान देणाऱ्या सर्पमित्राचा साप चावून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 08:44 PM2023-08-19T20:44:52+5:302023-08-19T20:45:29+5:30
विजय छबुराव यादव ( रा. लोणी भापकर ) असे सर्पदंशाने मृत्यु झालेल्या सर्पमित्राचे नाव आहे. लोणीभापकर येथील ते रहिवाशी होते.
पुणे - सुपे दि. १९ ( वार्ताहर ) बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे नजीक असणाऱ्या खराडवाडी येथे सर्पमित्राला १५ ऑगस्टला विषारी नाग चावल्याने दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज ( शनिवारी ) उपचार घेत असलेल्या सर्पमित्राचा अखेर मृत्यु झाला.
विजय छबुराव यादव ( रा. लोणी भापकर ) असे सर्पदंशाने मृत्यु झालेल्या सर्पमित्राचे नाव आहे. लोणीभापकर येथील ते रहिवाशी होते. बारामती तालुका खरेदी विक्री संघात ते कर्मचारी म्हणुन कार्यरत होते. गेली ३० वर्षापासुन सर्पमित्र म्हणुन विनामोबदला ते समाजात काम करीत होते. खराडवाडी येथील युवराज भापकर यांच्या घरानजीक मंगळवारी ( दि. १५ ) विषारी सर्प निघाल्याची माहिती यादव यांना मिळाली. त्यास पकडण्यासाठी यादव तेथे आले होते. गोठ्यात असलेल्या जनावरांच्या मुरघासाच्या खड्डया जवळच नाग पकडताना यादव यांना सापाने दंश केला. मात्र त्यातुनही त्यांनी स्वत:स सावरुन नागास पकडले, व निर्जन स्थळी सोडुन दिले.
यावेळी यादव बेशुद्धावस्थेत गेल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी त्यांची प्रकृती खालावलेली होती. मात्र दोन दिवसापुर्वी प्रकृती सुधारना होत असताना आज ( शनिवारी ) त्यांचा मृत्यु झाला. यादव यांच्या समोर कोणतीही व्यक्ती असो त्यांना रामराम म्हणण्याची त्यांची एक पद्धत होती. त्यांची हीच पद्धत अनेकांनी अनुकरली होती. त्यांच्या निधनाची माहिती समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.