‘आयपीओ’च्या आमिषातून साॅफ्टेवअर इंजिनियरला गंडा; ऑनलाइन २८ लाख ३५ हजारांची फसवणूक
By नारायण बडगुजर | Published: January 24, 2024 06:42 PM2024-01-24T18:42:15+5:302024-01-24T18:42:33+5:30
वाकड येथील कस्पटे वस्तीत १५ नोव्हेंबर २०२३ ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत ही घटना घडली....
पिंपरी : विविध कंपन्यांचे ‘आयपीओ’ खरेदीच्या आमिषातून साॅफ्टवेअर इंजिनियरला गंडा घातला. ऑनलाइन पद्धतीने २८ लाख ३५ हजारांची फसवणूक केली. विविध बँकांच्या खातेधारकांसह महिलांवरही गुन्हा दाखल केला. वाकड येथील कस्पटे वस्तीत १५ नोव्हेंबर २०२३ ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत ही घटना घडली.
मयूर उमेश चुटे (३२, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. २३) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अर्पण चॅटर्जी, संशयित महिला, मोबाइल धारक, आयसीआयसीआय बँक, पंजाब नॅशनल बँक, फेडरल बँक, आयडीएफसी बँक, इंडसंट बँक व इतर बँकेचे खातेधारक यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयूर चुटे हे साॅफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांच्या फेसबुकरवर एआरके इनव्हेस्ट नावाचा ग्रुप दिसला असता त्यांनी ग्रुपच्या लिंकवर क्लिके केले. त्यावेळी संशयित महिलेने त्यांना एआरके इनव्हेस्ट नावाच्या व्हाटसअप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर मयूर यांच्या वडिलांनी मयूर यांना संशयित महिलेचा व्हाटसअप मोबाइल क्रमांक दिला. त्यावर मयूर यांनी संपर्क केला असता त्यांनी शेअर मार्केटबद्दल माहिती दिली. त्यानंतर १५ नोव्हेंबर २०२३ रोजी मयूर यांना पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी त्यांच्या कस्टमर सर्व्हिसचा क्रमांक दिला.
मयूर यांना विविध कंपन्यांचे आयपीओ खरेदी करण्याचे आमिष दाखवून त्यासाठी विविध बँकांच्या विविध खात्यांवर वेळोवेळी पैसे भरावयास सांगितले. तसेच तीन टप्प्यात पैसे विड्राॅल करण्यास सांगितले. त्यानुसार मयूर हे पैसे विड्राॅल करत असताना सिस्टम एररचे कारण सांगून तसेच पैसे विड्राॅल करत असताना मयूर यांनी काही चुका केल्याचे संशयित अर्पण चॅटर्जी याने फोनवरून सांगितले. तसेच पेनाॅल्टीच्या नावाखाली पैसे भरावयास लावून मयूर यांना एकूण २८ लाख ३५ हजार ६६३ रुपये भरण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर पैसे परत नकरता विश्वासघात करून रकमेचा अपहार करून फिर्यादी मयूर यांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड तपास करीत आहेत.