सामाजिक उत्सवात एक पाऊल; पुण्यात तृतीयपंथीयांचे गोविंदा पथक, दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 11:21 AM2023-09-07T11:21:04+5:302023-09-07T11:21:17+5:30
राष्ट्रवादीने तृतीयपंथीयांचे पथक स्थापन करून त्यांना समाजाच्या आनंदात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली
पुणे: सुरक्षा रक्षकांच्या नोकरीत घेऊन महापालिकेने तृतीयपंथीयांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी एक पाऊल टाकले, आता राजकीय पक्षांनी त्यांना सामाजिक सहभाग देत दुसरे पाऊल टाकले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी त्यांचे एक गोविंदा पथकच स्थापन करून त्यांना दहीहंडी फोडण्याची संधी मिळवून दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर शाखेकडून दरवर्षी दहीहंडी उत्सव जोरात साजरा केला जातो. मानकर यांचाच त्यात पुढाकार असतो. आता तृतीयपंथीयांचे पथक स्थापन करून त्यांना समाजाच्या आनंदात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. हे राज्यातील पहिलेच पथक असेल.
या पथकात ५० पेक्षा जास्त तृतीयपंथी सहभागी होणार आहेत. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड असे ४ गोविंदा पथक यंदा दहीहंडी उत्सवात भाग घेणार आहेत. यापूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांनी तृतीयपंथीयांना सुरक्षा रक्षकाची नोकरी देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं आहे. या पथकाचा सराव सुरू असून आजच्या दहीहंडी सणात ते उत्साहात सहभागी होतील. यातून समाजाच्या त्यांच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल होईल, असा विश्वास वैदेही वरहाडे यांनी व्यक्त केला.