हॉस्टेल चालकाने मारहाण, शिवीगाळ केल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 10:16 AM2024-04-11T10:16:44+5:302024-04-11T10:18:09+5:30
अभिलाषा मित्तल ही आरोपी सुनील महानोर चालवत असलेल्या फॉर्च्युन लिव्हिंग हॉस्टेलमध्ये मागील तीन महिन्यांपासून राहायला होती....
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अभिलाषा मित्तल (वय २७, रा. शुक्रवार पेठ) या तरुणीला शिवीगाळ तसेच मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हॉस्टेल चालकाला अटक करण्यात आली आहे. सुनील परमेश्वर महानोर (२७, रा. शुक्रवार पेठ, मूळ रा. शेरेवाडी, पो. लोणी, रा. शिरूर कासार, जि. बीड) असे अटक झालेल्या हाॅस्टेल चालकाचे नाव आहे.
याबाबत अभिलाषा हिचे वडील महेंद्र मित्तल (वय ५१, मूळ रा. चंद्रकला निवास, नाथबाबा गल्ली, जालना) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा ते सव्वासातच्या सुमारास गुरूवार पेठ येथील फॉर्च्युन लिव्हिंग गर्ल्स हॉस्टेल येथे घडली. फिर्यादी महेंद्र मित्तल यांची मुलगी अभिलाषा मित्तल ही आरोपी सुनील महानोर चालवत असलेल्या फॉर्च्युन लिव्हिंग हॉस्टेलमध्ये मागील तीन महिन्यांपासून राहायला होती.
घटनेच्या दिवशी हॉस्टेल चालक सुनील महानोर आणि अभिलाषा यांच्यात डिपॉझिटवरून वाद झाले होते. यानंतर आरोपी सुनील महानोर याने अभिलाषाला शिवीगाळ करत मारहाण केली होती. या त्रासाला कंटाळून अभिलाषाने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याची माहिती मिळाल्यानंतर मित्तल यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सुनील महानोर याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. ९) सुनील महानोरला न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एल. एन. सोनवणे करत आहेत.