शालेय शिक्षण घेतानाच विज्ञानाची गोडी; पुण्यात भरणार बाल वैज्ञानिकांचा मेळा
By प्रशांत बिडवे | Published: December 21, 2023 06:46 PM2023-12-21T18:46:45+5:302023-12-21T18:47:21+5:30
सहाशे विद्यार्थी सहभागी होणार असून २२५ स्टॉल्सची उभारण्यात येणार
पुणे : शालेय शिक्षण घेतानाच विज्ञानाची गोडी लागावी तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, सृजनशीलता वाढावी या हेतूने राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन भरविण्यात येते. यंदा पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे प्रदर्शनाचे दि. २६ ते ३१ डिसेंबर या कालावधीत आयाेजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सहाशे विद्यार्थी सहभागी होणार असून २२५ स्टॉल्सची उभारण्यात येणार आहे अशी माहिती एससीईआरटीचे संचालक अमाेल येडगे यांनी दिली.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एसीईआरटी)यांच्या संयुक्त विद्यमाने या ५० व्या बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे आयाेजन केले आहे. त्यामध्ये राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनांमधून राष्ट्रीय स्तरावर पात्र झालेले विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच विज्ञान विषयक उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यातील शासकीय व अशासकीय संस्थांचे स्टॉलही प्रदर्शनामध्ये मांडण्यात येतील. महाराष्ट्राची संस्कृती, पारंपरिक खेळणी आदी विषयांचे स्टॉल हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम आणि मार्गदर्शन पर व्याख्यानांचेही आयोजन केले आहे.
राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात राज्य शासन, केंद्रीय विद्यालय संघटन, नवोदय विद्यालय, ऍटोमिक एनर्जी केंद्रीय विद्यालय, तिबेटीयन विद्यालय, एन. सी.ई. आर. टी. सी संलग्न शाळा आदी विविध व्यवस्थापनाच्या शाळा सहभागी होणार आहेत. दि. २६ राेजी दुपारी २ ते ५ तसेच दि. २७,२८,२९ डिसेंबर राेजी सकाळी १० ते ५ आणि दि. ३० राेजी सकाळी १० ते दुपारी १ या कालावधीत नागरिकांना प्रदर्शनास भेट देता येणार आहे.
तंत्रज्ञान आणि खेळणी हा मुख्य विषय
‘तंत्रज्ञान आणि खेळणी ’ हा या प्रदर्शनाचा मुख्य विषय आहे. यासह १. माहिती, संप्रेषण आणि तंत्रज्ञानातील प्रगती , २. पर्यावरणास अनुकूल सामग्री, ३. आरोग्य आणि स्वच्छता , ४. वाहतूक आणि नवोपक्रम, ५. पर्यावरणीय चिंता, वर्तमान या सह ऐतिहासिक विकास ,आमच्यासाठी गणित आदी सहा उपविषय निर्धारित केले आहेत.