दहा वर्षाच्या बालकाने केले ह्रदयासह किडणीचे दान; प्रतीक्षेत असलेल्या तीन बालकांना जीवनदान
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: January 8, 2024 05:09 PM2024-01-08T17:09:48+5:302024-01-08T17:10:25+5:30
अपघातात जखमी झाल्यावर ससूनमध्ये उपचार घेत असताना ब्रेनडेढ झालेल्या बालकाचे अवयवदान कारण्यात आले
पुणे: रस्ता अपघातात जखमी झालेल्या अवघ्या १० वर्षीय बालकाने रविवारी अवयवदान केल्याने अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या तीन बालकांना जीवनदान मिळाले आहे. ससूनमध्ये उपचार घेत असताना ब्रेनडेढ झालेल्या या बालकाच्या कुटूंबिय व नातेवाईकांनी त्याच्या अवयव दानाला परवानगी दिल्याने त्यात दोन किडणी व ह्रदयाचे दान केले.
हा मुलगा मुळचा बुलढाणा जिल्हयातील असून ताे आईवडिलांसह कामानिमित्त सातारा जिल्हयातील खटाव तालुक्यात आला होता. डिकसळ या गावी हा बालक रस्त्याने जात असताना पाठीमागून चारचाकी गाडीने त्याला धडक दिल्याने त्याच्या डाेक्याला जबर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी सुरवातीला सातारा जिल्हा रुग्णालय व नंतर ससून रुग्णालयात 5 जानेवारीला रात्री दाखल केले. मात्र दुखापत गंभिर असल्याने त्याला डाॅक्टरांनी ७ जानेवारीला मेंदुमृत म्हणजे ब्रेनडेड घोषित केले.
त्यावेळी ससूनमधील वैदयकीय समाजसेवा अधीक्षक व अवयव प्रत्यारोपन समन्वयक सत्यवान सुरवसे, अरुण बनसाेडे, जगदिश बोरूडे व रत्नभुषण वाढवे यांनी अवयवदान बाबत समुपदेशन केले असता कुटूंबियांनी व उपस्थित सर्व नातेवाईकांनी अवयवदानाला संमती दिली.
त्यानंतर त्याचे ह्रदय पिंपरीतील डाॅ. डी. वाय. पाटील मेडिकल काॅलेज व हाॅस्पिटल येथील रुग्णावर, एक किडणी वानवडीतील कमांड हाॅस्पिटल, व दुसरी किडणी सिंबायाेसिस हाॅस्पिटलमधील रुग्णांवर प्रत्यारोपण करण्यात आली. आता त्या तिघांचीही परिस्थिती स्थिर आहे. या प्रक्रियेत पुणे विभागीय प्रत्यारोपन समन्वय समितीच्या मुख्य समन्वयक आरती गाेखले यांनी सातारा ते पुणे व पुणे ते बुलढाणा येथे जाण्यासाठी कार्डियाक अॲंम्ब्यूलन्स उपलब्ध करून दिली.
हे अवयवदान ससून रुग्णालयाचे अधिष्टाता डॉ. विनायक काळे, वैदयकीय अधीक्षक तथा ब्रेनडेड कमिटीचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली बधिरीकरण शास्त्र विभागाचे डाॅ. अनंतकुमार पांडे, ट्रामा आयसीयुमधील डाॅ. सुजीत क्षीरसागर, व सर्व ट्रामाचे डाॅक्टर, कर्मचारी, डाॅ. हरिष ताटिया, डाॅ. अनंत बीडकर, डाॅ. राेहित बाेरसे, डाॅ. किरणकुमार जाधव, डाॅ. संजय व्हाेरा, डाॅ. साेनाली साळवी आदींचे याेगदान लाभले.
पुणे विभाग अवयवदानात टाॅपला
महाराष्ट्रात गेल्यावर्षी (२०२३) १४८ अवयवांचे दान करण्यात आले. त्यापेकी झेडटीसीसीचा पुणे विभाग क्रमांक एकवर आहे. पुणे विभागात ५८, मुंबई - ४९, नागपुर - ३५ आणि छत्रपती संभाजीनगर - ६ असे एकुण १४८ अवयवांचे अवयवदान झाले.