Pune | शिंगवेत भीषण अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ गाडी थेट नदीपात्रात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 11:56 AM2023-05-20T11:56:38+5:302023-05-20T12:02:20+5:30
ही घटना शुक्रवार दि. १९ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती पारगाव पोलिसांनी दिली...
अवसरी (पुणे) : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव शिंगवे येथील घोडनदी पात्रात स्कॉर्पिओ गाडी नदीच्या पुलावरून खाली पडून दोन जण जखमी झाले असून स्कॉर्पिओ गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. नशीब बलवत्तर म्हणून दोघे थोडक्यात बचावले. ही घटना शुक्रवार दि. १९ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती पारगाव पोलिसांनी दिली.
वाहन चालक सुरेश गोविंद दाते (वय.५८ - रा काठापूर ता. शिरूर) व नारायण डोके (वय. ५० रा- शिंगवे ता. आंबेगाव ) अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या पुलाशेजारी दुसऱ्या नवीन पुलाचे काम सुरु असल्याने पुलापासून ३० ते ४० अंतरावर नदीच्या पात्रातील पाणी अडवण्यात आले होते. त्यामुळे पुलाजवळील नदी पात्रात पाणी नव्हते. यामुळे दोघांचे जीव वाचले आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंगवेहून सुरेश दाते अष्टविनायक रस्त्यावरुन चारचाकी स्कॉर्पिओ (गाडी नंबर- MH 12 HL 4263 ) ही भरधाव वेगाने घोडनदीवरील पारगावच्या पुलावरून जात होते. वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून चारचाकी स्कॉर्पिओ पुलावरून दोन पलटी मारुन नदी पात्रात कोसळली. यामध्ये वाहन चालक सुरेश दाते गंभीर जखमी झाले आहेत. नारायण डोके हे किरकोळ जखमी झाले. दोघांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुलाच्या सुरुवाच्या ठिकाणी पुलाची उंची कमी असल्याने व पुलाजवळील नदी पात्रात पाणी नसल्याने त्यांचे जीव वाचले.