kothrud Vidhan Sabha: पुणे शहरात ठाकरे गटाचा एक उमेदवार; कोथरुडमध्ये रंगणार तिरंगी लढत, मोकाटे यांना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 01:36 PM2024-10-28T13:36:33+5:302024-10-28T13:38:11+5:30
ठाकरे गटाकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार इच्छुक होते
पुणे : विधासनभा निवडणुकीसाठी पुणे शहरातील ८ मतदार संघात ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर होण्यास विलंब झाला होता. ठाकरे गटाने कोथरूड आणि हडपसर या २ मतदार संघाची मागणी केली होती. हडपसर मात्र शरद पवार गटाकडे देण्यात आला. आता मात्र कोथरूडमध्ये कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.
महाविकास आघाडीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला कोथरुडची जागा मिळाली आहे. या जागेवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार इच्छुक होते; पण या ठिकाणी चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चंद्रकांत मोकाटे यांना मातोश्री येथे पक्षाचा एबी फाॅर्मही देण्यात आला आहे. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, रवींद्र मिर्लकर, सचिन अहिर, मिलिंद नार्वेकर, प्रशांत बधे उपस्थित होते.
कोथरुड मतदारसंघामध्ये भाजपने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना, तर मनसेने किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी दिल्यामुळे या मतदारासंघात आता तिरंगी लढत होणार आहे. चंद्रकांत मोकाटे यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत किशोर शिंदे यांचा ८ हजार मतांनी पराभव विजय मिळवला होता. तर २०१४ च्या निवडणुकीत आमदार मेधा कुलकर्णी विजयी झाल्या होत्या. त्यावेळी मोकाटे मोठ्या फरकाने पराभूत झाले. आता पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मोकाटे यांना संधी देण्यात आली आहे.