कुत्र्यांच्या उपद्रवानंतर मांजरींपासूनही धोका; पुण्यात गेल्या वर्षी २७१० जणांना मांजरांचे चावे
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: June 21, 2023 02:54 PM2023-06-21T14:54:09+5:302023-06-21T14:54:24+5:30
कुत्र्यांप्रमाणेच, रेबिज संक्रमित मांजराच्या चाव्याने देखील माणसाला रेबिज होऊ शकताे
पुणे: आपण माेकाट आणि पाळीव कुत्र्यांचा चावा घेतल्याचे ऐकताे. परंतू, आता शहरात मांजर चाव्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. महापालिकेच्या पशुवैदयकीय विभागाकडील नोंदीनुसार शहरात 2022 मध्ये एकूण 2710 मांजर चावण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. तर, 2021 मध्ये 1655 मांजर चावण्याची घटना घडल्या हाेत्या. मागील वर्षाच्या तुलनेत ही 38% वाढ झाली आहे. तसेच, जानेवारी ते मे दरम्यान केवळ गेल्या पाच महिन्यांत 1869 मांजर चावण्याच्या घटनांची नोंद झाली आहे जी 2022 च्या तुलनेत जवळपास 70% नी वाढली आहे.
कुत्रा चावल्याप्रमाणेच, मांजर चावल्याने देखील आपल्याला देखील रेबिजचा संसर्ग हाेउ शकताे. जर ते मांजर रेबिजने बाधित असेल तर रेबीज होऊ शकतो आणि त्यामुळे वाढत्या घटना नागरिकांमध्ये चिंतेचे कारण आहेत. महापालिकेने सप्टेंबरमध्ये मांजर नसबंदी कार्यक्रम सुरू केला होता आणि सप्टेंबर ते मार्च दरम्यान 3 हजारहून अधिक मांजरींचे निर्बिजीकीकरण्यात करण्यात आले आहे.
कुत्र्यांप्रमाणेच, रेबिज संक्रमित मांजराच्या चाव्याने देखील माणसाला रेबिज हाेउ शकताे. जेव्हा संक्रमित प्राण्याची लाळ जखमेच्या किंवा त्वचेच्या किंवा पातळ त्वचेच्या संपर्कात येते, तसेच जनावरांच्या चाव्यामुळे रक्तस्त्राव होतो तेव्हा रेबीज होऊ शकतो. हा संसर्ग नखांद्वारे देखील होऊ शकतो. तर त्याचप्रमाणे मांजर चावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
मांजर चावल्याने देखील रेबीजचा संसर्ग होऊ शकतो आणि म्हणून आता आम्ही मांजरींसाठी नसबंदी आणि लसीकरण कार्यक्रम सुरू केला आहे. सुदैवाने आमच्याकडे मांजर चावल्यामुळे रेबीजचा एकही मृत्यू झाला नाही. सप्टेंबर ते मार्च दरम्यान, महापालिकेने 3 हजार 172 मांजरींचे निर्बिजीकीकरण केले आहे. ही केवळ पुण्यातीलच चावे नसून शेजारील जिल्ह्यांतूनही असे चावे घेतलेले रुग्ण पुण्यात उपचारासाठी आलेले आहे. राज्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत राज्यात सर्वाधिक मांजरींची नसबंदी आमच्या विभागाने केली आहे. - डाॅ. सारिका फुंडे, प्रमुख, पशुवैदयकीय विभाग, पुणे मनपा
वर्ष मांजरांचे चावे
2017: 757
2018: 850
2019: 1164
2020: 1217
2021: 1655
2022: 2710
2023 (मे पर्यंत): 1869