मुळशी तालुक्यातील प्लस व्हॅली येथील कुंडात बुडून एका पर्यटकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 06:03 PM2022-11-21T18:03:13+5:302022-11-21T18:03:22+5:30
तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांना मृतदेह बाहेर काढण्यास यश मिळाले
पौड : मुळशी तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या प्लस व्हॅली या भागात पर्यटनासाठी गेलेल्या ट्रेकरचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांना मृतदेह बाहेर काढण्यास यश मिळाले आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर ही व्हॅली असून या घटनेने मित्रांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अजित मोतीलाल कश्यप (वय २३ वर्ष, रा. खराडी, मूळ गाव दिल्ली) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून देण्यात आलेली माहिती अशी की, अजित कश्यप, अभिजित रोहिला, आलोक रावत, प्रभाकर पवार, ओंकार साधले हे मुळशी तालुक्यात असणाऱ्या डोंगरवाडी येथील प्लस व्हॅली येथे ट्रेकिंगसाठी आले होते. पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असणारी ही व्हॅली प्रसिद्ध आहे. या व्हॅलीत तीन कुंड असून येथे लोक पोहण्यासाठी उतरत असतात.
त्यातील एका कुंडात अजितचे दोन मित्र उतरले होते. त्यानंतर अजित पाण्यात उतरत असताना त्याचा तोल गेल्याने त्याचे डोके कुंडामधील दगडावर आदळले. तो अतिशय घाबरलेल्या अवस्थेत होता. तरीही तो पाण्यात हात पाय मारत होता. जवळ पोहत असलेल्या ट्रेकर्सनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत तो पाण्यात बुडाला होता.
मिञांनी मदतीसाठी आरडाओरडा केला व मोबाईलला रेंज शोधत ११२ वरती फोनकरून मदत मागितली. त्याच वेळी अजितच्या मित्रांनी त्याच्या घरी अपघात झाल्याचे कळवले अजितच्या नातेवाईकांनी ते महाराष्ट्र बाहेर राहत असल्याने त्यांनी पुणे ग्रामिणचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील आणि मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण यांच्याशी संपर्क साधला.
पौड पोलिस स्टेशनचे पोलिल निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार सचिन शिंदे, ईश्वर काळे, नवनाथ शिंदे, सिध्दार्थ पाटील ,गौमत लोकरे,नरेश इमुल, गणेश साळूंके, आकाश पाटील,साईल शेख या पोलिसासह मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती व्यवस्थापक अध्यक्ष प्रमोद बलकवडे, आपत्ती व्यवस्थापन समिती मुळशी आणि माणगाव रेक्सुव रायगड टिमचे शेलार मामा, प्रशांत शेलार, मजित शेख, राजू प्रधान, गणेश निवेकर पुलिस पाटील निवे, अमोल शिंदे, शंकर, समीर बामगुडे, शरद बहिरट, शशिकांत चोरघे,सहिल गव्हाने, गणेश बामगुडे विलास भंडारी अभिषेक भोसले, किरण वाळे, सार्थक मुजानी, फराण शेख, सुरज झेंडे, विक्रम मोहिते, धायरिशल जगदाळे, यांनी दरीतून मृतदेह बाहेर काढला.