नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी ‘व्हिस्टाडोम’ने सफर; पुण्यातून एक लाख १६ हजार प्रवाशांनी केला प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 02:17 PM2024-05-06T14:17:25+5:302024-05-06T14:18:48+5:30
गेल्या आर्थिक वर्षात पुण्यातून एक लाख १६ हजार ११९ प्रवाशांनी व्हिस्टाडोम कोचमधून प्रवास केला आहे....
पिंपरी : पुण्यातून धावणाऱ्या चार एक्स्प्रेसला जोडलेल्या व्हिस्टाडोम कोच डब्यांना प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आर्थिक वर्षात पुण्यातून एक लाख १६ हजार ११९ प्रवाशांनी व्हिस्टाडोम कोचमधून प्रवास केला आहे. त्यामधून पुणे विभागाला १२ कोटी ६५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
मध्य रेल्वेकडून मुंबई-गोवा मार्ग, पुणे-सिकंदराबाद व मुंबई-पुणे मार्गावरील गाड्यांना व्हिस्टाडोम कोच बसविण्यात आले आहेत. त्यामध्ये पुणे विभागातून धावणाऱ्या चार गाड्यांचा समावेश आहे. पुणे-मुंबईदरम्यानच्या मार्गावर दऱ्या, खोऱ्या, नद्या आणि धबधब्यांची दृश्ये नागरिकांना अनुभवायला मिळत आहेत. पावसाळ्यात तर या मार्गावर व्हिस्टाडोममधून जाणे म्हणजे एक पर्वणीच असते. त्यामुळे प्रवाशांकडून व्हिस्टाडोमला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पुणे-मुंबई मार्गावर व्हिस्टाडोमला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे पुणे-सिकंदराबाद शताब्दीला व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे. पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसच्या प्रवाशांना उजनी बॅकवॉटर आणि भिगवणजवळील धरणाचा आनंद घेत आहेत. तसेच विकाराबादजवळील अनंतगिरी टेकड्यांमधून जाताना जंगलातील निसर्गसौंदर्य पाहता येते. त्यामुळे अल्पावधीतच शताब्दीचा व्हिस्टाडोम प्रवाशांच्या पसंतीला उतरला आहे.
डेक्कन एक्स्प्रेसला सर्वाधिक पसंती
पुणे विभागातून धावणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेस, शताब्दी, डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेसच्या व्हिस्टाडोममधून २०२३-२४ या आर्थिक वर्षात एक लाख १६ हजार ११९ प्रवाशांनी प्रवास केला आहे. यामधून पुणे रेल्वे विभागाला १२ कोटी ६५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. डेक्कन एक्स्प्रेसच्या व्हिस्टाडोमला सर्वाधिक पसंती मिळाली असून, त्यातून ३१ हजार १६२ प्रवाशांनी प्रवास केला.
जनशताब्दी एक्स्प्रेसला पहिला व्हिस्टाडोम कोच
मध्य रेल्वे प्रशासनाकडून २०१८ मध्ये मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये पहिला व्हिस्टाडोम कोच बसविला. या कोचला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर २६ जून २०२१ पासून मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसला व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला. तिसरा व्हिस्टाडोम कोच १५ ऑगस्ट २०२१ पासून डेक्कन क्वीनला जोडण्यात आला. २५ जुलै २०२२ रोजी चौथा व्हिस्टाडोम कोच प्रगती एक्स्प्रेसला जोडण्यात आला होता. तर मध्य रेल्वेने १० ऑगस्ट २०२२ पासून पुणे-सिकंदराबाद शताब्दीला आणि १५ सप्टेंबर २०२२ पासून तेजस एक्स्प्रेसला व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला.
एक्स्प्रेस - प्रवासी संख्या - उत्पन्न (कोटीत)
प्रगती - ३०,९८१ - २.६०
डेक्कन - ३१,१६२ - २.३५
डेक्कन क्वीन - २९,७०२ - २.७२
पुणे-सिकंदराबाद - २४,२७४ - ४.९८