एकवीस वर्षीय युवकाला मलमूत्र खाण्यास भाग पाडले; घृणास्पद कृत्याने इंदापूर हादरले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 07:06 PM2023-04-28T19:06:13+5:302023-04-28T19:06:26+5:30
हुंड्याचा वाद विकोपाला गेल्याने २१ वर्षीय युवकाला मारहाण करत लिंबू, हळद लावून शिव्या शाप देत मलमूत्र खाण्यास भाग पाडले
इंदापूर : काटी (ता. इंदापूर) येथे लग्नाचा आणि हुंड्याचा वाद विकोपाला गेल्याने एका २१ वर्षीय युवकाला मारहाण करत लिंबू हळद लावून शिव्या शाप देत त्याला मलमूत्र खाण्यास भाग पाडल्याचे घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकारामुळे इंदापूर तालुका हादरला असून या प्रकरणी १० जणांविरोधात महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात चार महिलांचाही समावेश आहे.
स्वप्नाली कासलिंग शिंदे, दिदी अजय पवार, वंदना बापुराव शिंदे, दिनेश शिंदे, बापुराव शिंदे, कासलिंग बापुराव शिंदे, अजय पवार, लखन काळे, दिनेश शिंदे याचा मुलगा (नांव माहित नाही), मंदा काळे (सर्व रा. काटी ता.इंदापूर), अतुल काळे (रा.अकलूज ता. माळशिरस,जि.सोलापूर) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिनकर उर्फ दिनेश शिंदे, लखन काळे,भीमराव शिंदे या तिघांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २१ वर्षीय युवक हा मूळचा फलटण येथील रहिवासी आहे. तीन वर्षांपूर्वी त्याचे आरोपीच्या मुलीबरोबर विवाह जमला होता. परंतु, हुंडयाच्या कारणावरून मुलीच्या आईवडिलांनी लग्नास विरोध करुन दुसऱ्या नातलगाबरोबर तिचे लग्न जमवले होते. दरम्यानच्या काळात संबंधित मुलगी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या संपर्कात होते. दुसरीकडे लग्न जमवताच १० एप्रिलला फिर्यादी आणि मुलगी पळून गेले. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. ते दोघे सातारा जिल्ह्यात असल्याचे समजले. त्यानंतर त्यांना पकडून ११ एप्रिलला काटी गावी आणण्यात आले.
काटी गावात आणल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी युवकाकडे ५ लाख हुंडा मागितला. पण युवकाने त्यास नकार दिल्याने त्याला मारहाण केली. देवाच्या नावाने आरडाओरडा करत फिर्यादीला लिंबू, हळद लावून शिव्या शापही दिला. त्यानंतर जबरदस्तीने नवरी मुलीसह आरोपी महिलांशी लज्जास्पद कृत्य करायला लावले. तसेच मानवी विष्ठा आणि लघवी पिण्यासारखे घाणेरडे कृत्य करण्यास भाग पाडले. एका आरोपी महिलेने या सर्व घटनेचा व्हिडिओ बनवून तो आपल्या फेसबुकवर शेअर केल्याचेही फिर्यादीत म्हंटले आहे. त्यामुळे आरोपींवर आयटी ॲक्टचे ६७ अ कलमानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवार करत आहेत.