पुण्यातील कोयता प्रकरणाला ट्विस्ट! तरुणीकडून ४ लाखाची फसवणूक अन् हत्येचा थरार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 20:47 IST2025-01-08T20:45:43+5:302025-01-08T20:47:26+5:30
शुभदा कोदारेने आपल्या वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगत वेळोवेळी कंपनीतील कलीग...

पुण्यातील कोयता प्रकरणाला ट्विस्ट! तरुणीकडून ४ लाखाची फसवणूक अन् हत्येचा थरार?
पुणे - पुण्यातील येरवडा परिसरात शुभदा कोदारे खून प्रकरणात नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. शुभदा आणि तिचा मारेकरी कृष्णा हे एकाच कंपनीत कार्यरत होते. शुभदाने खोटं बोलून वेळोवेळी कृष्णाकडून पैसे उकळल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभदा कोदारेने आपल्या वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगत वेळोवेळी कंपनीतील कलीग असलेल्या कृष्णा कनोजा याच्याकडून तब्बल ४ लाख रुपये उकळले होते. माझे वडील आजारी आहेत, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे, असे सांगत तिने कृष्णाकडून पैसे घेतले.
सुरुवातीला शुभदाच्या या खोट्या कथानकावर कृष्णा विश्वास ठेवत तिला पैसे देत राहिला, पण जेव्हा तिने अधिक पैसे मागण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याला संशय आला.
अशात कृष्णाने, सत्य जाणून घेण्यासाठी शुभदाचे मूळ गाव कराड गाठले. तिथे शुभदाचे वडील ठणठणीत असल्याचे समोर आले. "मी अजिबात आजारी नाही आणि माझ्यावर कोणतीही शस्त्रक्रिया झाली नाही," असे शुभदाच्या वडिलांनी कृष्णाला स्पष्ट सांगितले.
यामुळे आपला विश्वासघात झाल्याचा राग कृष्णाच्या मनात निर्माण झाला. पुण्यात परतल्यानंतर त्याने शुभदाकडे पैसे परत देण्याची मागणी केली. यातून दोघांमध्ये अनेक वेळा वादावादी देखील झाली.
अशातच मंगळवारी, कृष्णाने शुभदाला अद्दल घडवण्याच्या उद्देशाने कंपनीच्या पार्किंगमध्ये गाठले. वादानंतर कृष्णाने तिच्यावर धारदार कोयत्याने वार केले. शुभदाच्या उजव्या हाताच्या नसांवर झालेल्या गंभीर जखमेने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. तिची शुगर कमी झाल्याने रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. चतु:श्रृंगी पोलिसांनी या प्रकरणी कृष्णा कनोजा याला अटक केली आहे. या हल्ल्यामागे विश्वासघातामुळे झालेला राग आणि संताप होता, असे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.