हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी आलेल्या दोन वर्षीय चिमुकलीचा पाण्यात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 08:06 PM2022-08-15T20:06:38+5:302022-08-15T20:36:11+5:30
रक्षाबंधनासह दुपारपर्यंत विविध कार्यक्रम झाल्यावर दुपारी २.३० वाजनेच्या सुमारास सर्वजण जेवण करत असताना कनक ही आपल्या आत्याच्या लहान मुलांसह तेथे खेळत होती.
लोणी काळभोर - कोरेगाव मूळ येथील एका फार्महाऊसवर रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या मार्केटयार्ड परिसरातील व्यापाऱ्याच्या एकुलत्या एक लहान मुलीचा पाण्यात बुडन मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना उरूळी कांचन परिसरात घडली आहे. या घटनेत कनक वर्धमान कोठारी (वय २ वर्षे २ महिने, रा. राजलक्ष्मी को. ऑप. सोसायटी, गुलटेकडी) हीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
रविवार (१४ ऑगस्ट) रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धमान चंद्रशेखर कोठारी (वय ३१) हे आपली पत्नी काजल, मुलगी कनक, बहिण व इतर आप्तेष्ट असे एकूण २५ ते ३० जण रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी उरूळी कांचन परिसरातील कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील नेचर नेस्ट ॲग्रो टुरीझम या फार्महाऊसवर सकाळी ९ वाजण्याच्या सुमारांस आले होते.
रक्षाबंधनासह दुपारपर्यंत विविध कार्यक्रम झाल्यावर दुपारी २.३० वाजनेच्या सुमारास सर्वजण जेवण करत असताना कनक ही आपल्या आत्याच्या लहान मुलांसह तेथे खेळत होती. काही वेळानंतर सर्व मुले परतली त्यांत कनक नव्हती. सर्वानी तिचा शोध घेतला त्यावेळी ती फार्महाऊसवर असलेल्या लहान पुलाजवळ पाण्यात पडलेली आढळून आली. तिला तात्काळ उपचारासाठी लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. परंतू तेधील डॉक्टरांनी तपासणी करून तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.