पुण्यात अनोखं आंदोलन! क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच 'हे' तरुण शौचाला बसले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 11:56 AM2022-11-23T11:56:03+5:302022-11-23T11:56:51+5:30
पतीत पावन संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले..
पुणे प्रतिनिधी/ किरण शिंदे : सार्वजनिक शौचालयाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाला वारंवार कळवूनही दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. पुणे महानगरपालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच प्रतिकात्मकरित्या शौचाला बसून आंदोलन करण्यात आले. पतीत पावन संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या मीनाताई ठाकरे वसाहत गुलटेकडी येथील शौचालयाच्या दुरावस्थेबाबत येथील रहिवाशी मागील आठ महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र महापालिका प्रशासनाने आजवर त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे पतीत पावन संघटना पुणे शहर यांच्या वतीने बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयावर धडक मोर्चा काढत नैसर्गिक विधीचा हक्क नाकारणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयाच्या दारात प्रतीकात्मक सौचाला बसून निषेध नोंदवण्यात आला. तसेच क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त भांगे यांना घेराव घातला गेला.
सहाय्यक आयुक्त भांगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बोलवून घेऊन सर्व मागण्या मान्य करत त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हा मोर्चा स्थगित करण्यात आला. या आंदोलनाचे नियोजन नियोजन पतित पावन कामगार महासंघ अध्यक्ष रवींद्र भांडवलकर व पर्वती विभागप्रमुख संतोष गुरु यांच्या नेतृत्वात या मोर्चाचं आयोजन करण्यात आले व सोबत स्थानिक महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.