Pune Traffic: पुण्याच्या ट्रॅफिककडे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन; काँग्रेस कार्यकर्ते करणार घोड्यावरून प्रवास
By राजू हिंगे | Updated: June 18, 2024 14:54 IST2024-06-18T14:53:52+5:302024-06-18T14:54:09+5:30
पुण्यातील महत्त्वाचे रस्ते, गल्लीबोळ, बाजारपेठांमध्ये रोज वाहतूक कोंडी अनुभवायला मिळत आहे

Pune Traffic: पुण्याच्या ट्रॅफिककडे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन; काँग्रेस कार्यकर्ते करणार घोड्यावरून प्रवास
पुणे : शहरातील वाहतुक कोंडीच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी कॉग्रेस कार्यकर्त पुण्यात अभिनव आंदोलन करणार आहे. पुण्यातील प्रतिष्ठित नागरीक २१ जून रोजी सकाळी १० वाजता राष्ट्र भूषण चौक ते एस पी कॉलेज या दरम्यान घोड्यावरून प्रवास करणार आहेत.
शहरात प्रवास करणे सामान्य पुणेकरांना जिकरीच झाला आहे. पुण्यातील महत्त्वाचे रस्ते, गल्लीबोळ, बाजारपेठांमध्ये रोज वाहतूक कोंडी अनुभवायला मिळत आहे. विद्यार्थी, कामगार वर्ग, व्यापारी, रुग्ण यांना शाळा ,कॉलेज, ऑफिस, दुकान, हॉस्पिटलमध्ये जाताना अक्षरशः तास तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे. शिवाय या कोंडीमुळे अपघात होत आहेत. प्रशासन या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करीत आहे. पुणेकरांना वाहतूक कोंडी आणि खड्डे चूकवून जीव मुठीत घेउन प्रवास करावा लागतोय.
आरटीओ, महापालिका वाहतूक आणि पोलीस शाखा यांचे याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने अभिनव आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. यामध्ये आमदार रवींद्र धंगेकर, अजित अभ्यंकर डॉ. सतीश देसाई आदी सहभागी होणार आहेत, असे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांनी सांगितले.