Pune: नशेसाठी पैसे दिले नाही म्हणून तरुणाने १३ दुचाकी जाळल्या; आई म्हणाली, 'तो आमच्या जीवाचं बरं वाईट करेल'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 18:31 IST2025-03-11T18:27:53+5:302025-03-11T18:31:51+5:30
Pimpri Chinchwad News: एका २७ वर्षीय तरुणाने सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या १३ दुचाकी जाळल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Pune: नशेसाठी पैसे दिले नाही म्हणून तरुणाने १३ दुचाकी जाळल्या; आई म्हणाली, 'तो आमच्या जीवाचं बरं वाईट करेल'
Pimpri Chinchwad News Crime: पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी सातत्याने चर्चेचा विषय बनला असून, एका तरुणाने तब्बल १३ दुचाकी गाड्या जाळल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना घडली असून, आईने नशा करण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणातून त्याने हे कृत्ये केल्याचे तपासातून समोर आले. महत्त्वाचे म्हणजे त्याच्यावर कारवाई करा नाहीतर तो आमच्या जीवाचं बरं वाईट करेन, अशी भीतीही त्याच्या आईने व्यक्त केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ज्या तरुणाने १३ दुचाकी जाळल्या, त्याचे नाव स्वप्निल शिवशरण पवार, असे आहे. पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये तो दुचाकीला आग लावताना दिसत आहे. गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये कुठे घडली घटना?
ही घटना पिंपरीमधील मोरया क्षितिज बिल्डिंग या सोसायटीमध्ये घडली. स्वप्निल याच सोसायटीमध्ये राहतो. व्हिडीओ मध्ये दिसत आहे की, स्वप्निल एका गाडीला आग लावत आहे. त्यानंतर आगीचा भडका उडतो आणि सगळ्या गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून जळून खाक झाल्या.
पैसे दिले नाही म्हणून सोसायटीतील गाड्या पेटवल्या
स्वप्निल नशेच्या आहारी गेला आहे. गेल्या १० वर्षांपासून तू व्यसन करतो. त्याने आईकडे नशा करण्यासाठी पैसे मागितले. "मला पैसे द्या नाहीतर मी सोसायटीत लावलेल्या दुचाकी गाड्या पेटवून देईन", अशी धमकी त्याने आईला आणि लहान भावाला दिली. आईने पैसे न दिल्याने नंतर त्याने पार्किंगमधील दुचाकी गाड्यांना आग लावली.
सोसायटीतील नागरिकांनी तक्रार केल्यानंतर सांगवी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि अटक केली.
आईवरही कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न
स्वप्निलच्या आईने सांगितले की, "तो उच्चशिक्षित आहे. तो व्यसनाच्या आहारी गेला. त्यामुळे तो असे कृत्य करतो. पेसै दिले नाही, तर कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या देतो. तो गांजा आणि दारूच्या आहारी गेला आहे. त्याला तीन वेळा व्यसनमुक्ती केंद्रात ठेवले होते. पण, त्याचे व्यसन सुटले नाही. तो दररोज दोन हजार देण्याची मागणी करतोय. माझ्यावरही त्याने कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मी देखील पोलिसांत तक्रार दिली होती. त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा तो आमच्या जीवाचं बरं वाईट करेन", असे अटक करण्यात आलेल्या स्वप्निलची आई म्हणाली.