राज्यात प्रदूषणाचा व्हायरस; एन -९५, एन -९९ मास्क वापरा, आरोग्य विभागाच्या सूचना
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: November 6, 2023 03:16 PM2023-11-06T15:16:34+5:302023-11-06T15:16:50+5:30
राज्याचा वायु गुणवत्ता निर्देशांक धाेकादायक म्हणजे २०० च्या पुढे गेला असून या प्रदुषणाचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतात
पुणे : राज्याचा वायु गुणवत्ता निर्देशांक धाेकादायक म्हणजे २०० च्या पुढे गेला आहे. या प्रदुषणाचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. ते टाळण्यासाठी घराबाहेर पडताना नागरिकांनी एन -९५ मास्क किंवा एन -९९ मास्क वापरा, अशा सूचना राज्याच्या आराेग्य विभागाचे सहसंचालक डाॅ. प्रतापसिंह सारणीकर यांनी दिले आहेत. तसेच त्यासाठी रूमाल, कागदी मास्क, स्कार्फ आणि कापड प्रभावी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान हिवाळ्यामुळे वातावरणातील प्रदुषित वायू प्रदूषण आणि धुलिकण हे हवेतच राहिल्याने हवेची गुणवत्ता खराब होत आहे. यावर्षी प्रदुषणात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे खाेकला, श्वसनविकारांमध्ये वाढ झाली आहे. त्याची दखल राज्याच्या आराेग्य विभागानेही घेतली असून डाॅ. सारणीकर यांनी राज्यातील सर्व आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांना उपाययोजना सुचवल्या आहेत. तसेच काटेकोर पालन करण्याच्या सूचना त्यांनी सर्वच जिल्हयांना दिल्या आहेत.
डाॅ. सारणीकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार, वायू प्रदूषण म्हणजे आपण श्वास घेत असलेल्या हवेच्या नैसर्गिक वैशिष्ट्यांमध्ये बदल करणा-या वायू आणि घन कणांच्याद्वारे घरातील किंवा बाहेरील हवेचे हाेणारे प्रदुषण हाेय. आरोग्यास हानिकारक मुख्य प्रदूषकांमध्ये सुक्ष्म धुलिकण पदार्थ (पी.एम २.५ आणि पी.एम १०), कार्बन मोनोआॅक्साइड, ओझोन, ब्लॅक कार्बन, सल्फर डायआॅक्साइड आणि नायट्रोजन आॅक्साइड यांचा समावेश होतो. वायू प्रदूषण बहुतेक वेळा उघड्या डोळ्यांना दिसत नाही. कारण प्रदूषकांचा आकार मानवी डोळ्यांपेक्षा लहान असतो. त्यामुळे या बाबींची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.