पत्नीचा पतीवर विनाकारण संशय; महिलाच नव्हे, तर पुरुषही कौटुंबिक हिंसाचाराने त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 10:25 AM2022-11-30T10:25:07+5:302022-11-30T10:25:18+5:30
भरोसा सेलच्या महिला साहाय्य कक्षाकडे पुरुषांचे ११ महिन्यांत ७८७ तक्रार अर्ज
नम्रता फडणीस
पुणे : चार वर्षांपूर्वी लग्न झाले... काही दिवस दोघांचा संसार छान चालला... त्यानंतर मात्र, दोघांमध्ये खटके उडायला लागले. कारण हाेते, पत्नी पतीवर विनाकारण संशय घेणे. त्यावरून छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद व्हायला लागले. या सर्वांचा पतीला मानसिक त्रास व्हायला लागला. मात्र, कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या धाकामुळे तो सर्व त्रास सहन करीत राहिला. हे एक प्रातिनिधिक उदाहरण. यावरून केवळ महिलाच नव्हे, तर पुरुषही कौटुंबिक हिंसाचाराने पीडित आहेत.
मागील काही वर्षांत महिलांकडून होणारा त्रास असह्य झाल्याने पुरुषांनीही पोलिसांचे दरवाजे ठोठावले आहेत. गेल्या ११ महिन्यांत भरोसा सेलच्या महिला सहायता कक्षाकडे पुरुषांचे ७८७ अर्ज प्राप्त झाले आहेत.
पती किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून पत्नीचा मानसिक, शारीरिक छळ केला जातो. यात शंका नाहीच. मात्र, सर्वच पुरुषांना एका तराजूत तोलता येणार नाही. सध्या कौटुंबिक हिंसाचार कायदा म्हणजे महिलांच्या हातात आयते कोलीत मिळाल्यासारखे झाले आहे.
एकच महिला सासरकडचे लोक, पती यांच्याविरुद्ध वेगवेगळे दावे दाखल करते. काही वेळेला महिलेने केलेल्या तक्रारी पती आणि त्याच्या कुटुंबीयांना धडा शिकविण्यासाठीही केलेल्या असतात. विवाहित महिलांकडून या कायद्याचा गैरवापर होत असल्याचे सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले आहे. त्यामुळे आता पुरुषही कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गतच महिला आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात तक्रारी दाखल करण्यास पुढे येऊ लागले आहेत. या अंतर्गत तक्रार दाखल करण्याचे प्रमाण अद्यापही महिलांचे अधिक असले, तरी पुरुषांच्या तक्रारींचा आकडा ५०० च्या वर पोहोचला आहे. गेल्या ११ महिन्यांत महिला व पुरुष मिळून एकूण ३ हजार १९३ अर्ज प्राप्त झाले आहेत.
''कौटुंबिक हिंसाचारांतर्गत शारीरिक, आर्थिक, मानसिक अथवा शाब्दिक छळाच्या तक्रारी येतात. लग्न झाल्यानंतर नववधू आपल्यात ॲडजस्ट होतीये का? ती कशी राहते याकडे सासरकडच्यांचे लक्ष असते. त्यामुळे नवीन लग्न झाल्यावर, प्रेगन्सी दरम्यान, त्यानंतर आणि मुलांचा सांभाळ कसा करायचा यावरून वाद होतात. महिलाही पुरुषांशी शाब्दिक वाद घालतात, ते असह्य झाल्याने मग पुरुष हात उचलतात. त्यामुळे आमच्याकडे महिला व पुरुष दोघांचे एकमेकांविरूद्ध तक्रार अर्ज येतात. - सुजाता शानमे, सहायक पोलीस निरीक्षक, महिला सहाय्यता कक्ष, भरोसा सेल''