Pune Crime: दौंडमध्ये महिलेकडून डॉक्टरला चप्पलने मारहाण, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 05:40 PM2023-10-10T17:40:47+5:302023-10-10T17:42:38+5:30
स्वागत कक्ष व कॅश काउंटर येथे कर्मचाऱ्यांशी वाद...
पुणे : दौंड शहरात एका महिलेने डॉक्टरला मारहाण केल्याने दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या महिलेने डॉक्टरांशी कोणतीही बातचीत न करता प्रतीक्षा कक्षात गोंधळ घालत कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महिलेने फिर्यादी डॉ. तात्या भगवान निंबाळकर (लिंगाळी, ता. दौंड, जि. पुणे) यांच्या श्री साई हॉस्पिटलमध्ये येऊन डॉ. निंबाळकर यांना चप्पल आणि टेबलवरील पेपरवेटने मारहाण केली. त्यामुळे डॉ. निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून डॉ. अश्विनी अमोल वाळुंज (रा. पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड पुणे) यांच्यावर मारहाण करणे आणि अनधिकृतपणे हॉस्पिटलमध्ये घुसणे अशा प्रकारचा विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला डॉ. अश्विनी वाळुंज या डॉ. निंबाळकर यांच्या हॉस्पिटलच्या प्रतीक्षालयात आल्या. तेथे हॉस्पिटलच्या स्वागत कक्ष व कॅश काउंटर येथे कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांशी वाद केला. माझ्याकडे आलेल्या रुग्णांची मी तपासणी करीत असल्याने माझ्या कॅबिनमध्ये थांबून राहिलो. त्या दरम्यान डॉ. अश्विनी वाळुंज या अनधिकृतपणे माझ्या कक्षात येऊन माझ्याशी काहीएक संवाद न करता त्यांच्या पायातील चप्पल काढून माझ्या दिशेने फेकून मारली. ती चप्पल माझ्या डाव्या डोळ्यावर लागली. टेबलवरचा प्लास्टिकचा पेपरवेट उचलून माझ्या दिशेने भिरकावला. तो माझ्या डाव्या डोळ्याच्यावर कपाळावर लागला. हे सर्व झाल्यानंतर त्यांनी मला शिवीगाळ करून आत्महत्या करून तुमचे व हॉस्पिटलमधील सर्वांची नावे घेऊन तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवेन, अशी धमकी देऊन माझ्या सहायक डॉक्टरांनाही हाताने मारहाण करून निघून गेल्या. या घटनेचा अधिक तपास दौंड पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक किरण डुके करीत आहेत.