चौकशीच्या नावाखाली पोलीस चौकीत महिलेला बेदम मारहाण; मगरपट्टा पोलीस चौकीतील धक्कादायक प्रकार
By विवेक भुसे | Published: February 13, 2024 03:51 PM2024-02-13T15:51:49+5:302024-02-13T15:52:24+5:30
मारहाणीच्या याप्रकरणात दोषी आढळून आलेल्या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह एका अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : हडपसर भागातील मगरपट्टा सिटीत घरकाम करणाऱ्या महिलेवर चोरीचा आळ घेतल्यानंतर तिला चौकशीसाठी पोलीस चौकीत बोलावून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने पोलिसांना पिण्यास पाणी मागितले. तेव्हा तिला लघुशंका प्यायला सांगण्यात आले, असा आरोप महिलेने केला आहे. महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी गंभीर दखल घेतली असून, याप्रकरणात दोषी आढळून आलेल्या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह एका अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तक्रारदार महिला मगरपट्टा सिटीत एका कुटुंबात घरकाम करते. संबंधित कुटुंबाच्या घरातून ऐवज चोरीला गेल्यानंतर त्यांनी मगरपट्टा पोलीस चौकीत तक्रार दिली. घरकाम करणाऱ्या महिलेने चोरी केल्याचा संशय त्यांनी तक्रारीत व्यक्त केला. त्यानंतर मगरपट्टा पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी मुंढवा येथे वास्तव्यास असलेल्या महिलेला पोलीस चौकीत चाैकशीसाठी नेले. पोलीस चैाकीत तिला बेदम मारहाण करण्यात आले. महिलेला साडेचार तास डांबून ठेवण्यात आले. महिला घरी न आल्याने तिचे कुटुंबीय विचारपूस करण्यासाठी मगरपट्टा पोलीस चौकीत गेले. तेव्हा पोलिसांनी नातेवाईकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मारहाण करणाऱ्या पोलिसांना चौकीत पाणी मागितले. तेव्हा त्यांनी लघुशंका पिण्यास सांगितले, असा आरोप महिलेने केला.
मारहाणीमुळे महिलेला चालता येत नव्हते. तिने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. युवा सेनेचे शहरप्रमुख सनी गवते. शुभम दुगाने, बाबासाहेब काेरे, प्रसाद खुडे, मोहन भालेराव यांनी यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना निवेदन दिले. महिलेला बेदम मारहाण करणाऱ्या पोलिसांविरुद्ध कारवाईची मागणी त्यांनी केली. सहपोलीस आयुक्तांनी याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. महिलेला पोलीस चौकीत बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला.
याप्रकरणाची चौकशी करण्यात आली. प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या दाेन महिला पोलीस कर्मचाऱ्यासह एका अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.- आर. राजा, पोलीस उपायुक्त