पुण्यात महिलेला ठाण्यातच मारहाण, PSI सह ९ जणांवर गुन्हा; समर्थ पोलिस ठाण्यातील प्रताप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 10:28 AM2024-06-15T10:28:41+5:302024-06-15T10:29:56+5:30
याबाबत पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर समर्थ पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकासह ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
पुणे : बलात्काराची तक्रार द्यायला आलेल्या महिलेला पोलिस ठाण्यातच उपनिरीक्षक, महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याबाबत पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर समर्थ पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकासह ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक अर्जुन दिवेकर, हवालदार नीलम कर्पे, माया गाडेकर, योगिता आफळे, दोन महिला पोलिस शिपाई, तसेच पीडितेचा नवरा अक्षय जीवन आवटे (३१, रा.सोमवार पेठ), आदित्य गौतम (३०, रा.साततौटी चौक, कसबा पेठ) आणि सुजीत पुजारी (रा.आंबेगाव बुद्रुक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २५ वर्षीय महिलेने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, उपनिरीक्षकासह अन्य आरोपींविरुद्ध विनयभंग, मारहाण, धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महिलेने बलात्कारप्रकरणी आरोपी सुजीत पुजारी, आदित्य गौतम यांच्याविरुद्ध मार्च २०२३ मध्ये तक्रार दिली होती. पती अक्षय आवटे याने वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचा आराेप तिने केला होता. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी पुजारी, गौतम, आवटे यांच्याविरुद्ध बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांकडे तक्रार दिल्याने आरोपी चिडले होते. २३ मार्च २०२३ रोजी महिलेला समर्थ पोलिस ठाण्यात बोलावले होते.
पती अक्षय, त्याचे मित्र पुजारी आणि गौतम यांनी शिवीगाळ करून धमकी दिली. समर्थ पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्याने पीडितेला पोलिस ठाण्यात बोलविले. तेथे उपनिरीक्षक आणि महिला कर्मचाऱ्यांनी पट्ट्याने मारहाण केली, असा आरोप महिलेने फिर्यादीत केला आहे.
आरोपी पुजारी आणि गौतम सोमवार पेठेतील भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी मला धमकावले. माझ्याकडे पाहून ते थुंकले, असा आरोप महिलेने फिर्यादीत केला आहे. महिलेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक दादासाहेब पाटील तपास करत आहेत.