शेतात भुईमुग काढायला गेलेल्या महिलेचा विज पडून मृत्यू; खेड तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 07:05 PM2024-06-04T19:05:33+5:302024-06-04T19:06:01+5:30
भुईमुग पाल्यावर झाकण टाकून मंगल निघाल्या असता अचानक विज कोसळली
राजगुरुनगर: तिन्हेवाडी, (ता. खेड ) येथे शेतात भुईमूग काढायला गेलेल्या महिलेच्या अंगावर विज पडून मृत्यु झाला.मंगल रंगनाथ आरूडे , वय ४० असे मृत्यु पावलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्या मागे पती, मुलगा मुलगी असा परिवार आहे.
तिन्हेवाडी - कोहिनकर वाडी गावांच्या हद्दीवर असलेल्या शेंडेवस्ती येथील शेतात मंगळवारी (दि ४) ही घटना घडली. परिसरात दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या दरम्यान मंगल आरुडे व त्यांच्या दोन जाऊबाई शेतात भुईमुग काढायला आल्या होत्या. त्या घरी जायला निघाल्या. दोघीजणी काही अंतरावर पुढे गेल्या. भुईमुग पाल्यावर झाकण टाकून मंगल निघाल्या असता विज कोसळली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिस संदीप लोहकरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तीन्हेवाडीच्या सरपंच प्रतीक्षा पाचारणे, उपसरपंच रंगनाथ आरूडे, पी टी आरूडे, नानाभाऊ आरूडे, पोलिस पाटील ऍड सुषमा आरूडे, रोहिदास आरूडे, अंकुश आरूडे, अशोक आरूडे, वसंत आरूडे, गणेश कोहिनकर, संदीप गाढवे आदींनी मृतदेह शेतातून बाहेर काढायला मदत केली. मंगल आरूडे यांच्या दुर्दैवी मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.