महिलेचे अजब कृत्य; शरीराच्या आत लपवले तब्बल २० लाखांचे सोने, पुणे विमानतळावर खळबळ
By नितीश गोवंडे | Updated: July 4, 2023 17:04 IST2023-07-04T17:04:08+5:302023-07-04T17:04:15+5:30
रुग्णालयात एक्स रे तपासणी केली असता, तिच्या शरीरात ४२३ ग्रॅमच्या सोन्याची पेस्ट असलेल्या दोन पांढऱ्या कॅप्सूल आढळून आल्या

महिलेचे अजब कृत्य; शरीराच्या आत लपवले तब्बल २० लाखांचे सोने, पुणे विमानतळावर खळबळ
पुणे : दुबईहून स्पाईसजेटच्या विमानाने पुण्यात आलेल्या एका महिला प्रवाशाकडून २० लाख रुपयांचे ४२३ ग्रॅम सोने सीमा शुल्क विभागाने (कस्टम) जप्त केले आहे. या महिलेने सोन्याची पेस्ट असलेल्या कॅप्सूलमध्ये लपवून हे सोने आणल्याचे आढळून आले आहे.
या प्रकरणी एका ४१ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक प्रवासी महिला स्पाईसजेट एसजी-५२ या विमानाने दुबईहून पुणे विमानतळावर आली. या महिलेने विमानतळावरील ग्रीन चॅनल ओलांडल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांना तिच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या.
तिने तिच्या शरीराच्या आतील भागात काही वस्तू लपवून आणल्याचा संशय त्यांना आला. कस्टम अधिकाऱ्यांनी त्या महिलेची सखोल चौकशी केली. तिची रुग्णालयात एक्स रे तपासणी केली असता, तिच्या शरीरात ४२३ ग्रॅमच्या सोन्याची पेस्ट असलेल्या दोन पांढऱ्या कॅप्सूल आढळून आल्या. पुढील तपास कस्टम विभागाकडून करण्यात येत आहे.