'हे सामान तुम्ही बांधून ठेवा फक्त तेलाच्या ५ पिशव्या द्या', महिलेची बनवाबनवी; दुकानदारांना फसवले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 08:51 PM2022-06-27T20:51:30+5:302022-06-27T20:51:52+5:30
चंदननगर, खराडी परिसरातील ५ ते ६ दुकानात जाऊन ६ हजार १५० रुपयांच्या ३० तेलाच्या पिशव्या घेऊन फसवणूक केल्याचे आढळून आले
पुणे : किराणा दुकानात येऊन महिलेने सामानाची यादी दिली. हे सामान तुम्ही बांधून ठेवा, मी दुसऱ्या दिवशी येऊन पैसे देऊन सामान नेते, असे सांगून तिने तेलाच्या ५ पिशव्या घेतल्या व ती निघून गेली. मात्र, दुसऱ्या दिवशी ती आलीच नाही. किराणा दुकानदाराने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेव्हा या महिलेने अशाच प्रकारे आणखी काही दुकानदारांची फसवणूक केल्याचे उघड झाले.
याप्रकरणी पिराजी बाजीराव डफळ (वय ५८, रा. वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २३ जून रोजी रात्री दहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे खराडीमध्ये साई ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. फिर्यादी यांच्या दुकानात एक अनोळखी महिला आली. तिने मुलाचा वाढदिवस आहे, असे सांगून सामानाची यादी दिली. फिर्यादी यांच्याकडून ५ जेमिनी तेलाचे पाकिटे व त्याचे पैसे दुसऱ्या दिवशी सामानसोबत देते, असे सांगून त्या तेलाची पाकिटे घेऊन निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी ही महिला सामान नेण्यासाठी आली नाही की तिने पैसेही दिले नाहीत. अशाच प्रकारे तिने चंदननगर, खराडी परिसरातील ५ ते ६ दुकानात जाऊन ६ हजार १५० रुपयांच्या ३० तेलाच्या पिशव्या घेऊन फसवणूक केल्याचे आढळून आले आहे. गेल्या ४ ते ५ दिवसात हा प्रकार घडला आहे. चंदननगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.