भरधाव कंटेनरच्या धडकेत कारचालक तरुणाचा मृत्यू; हडपसर - सासवड रस्त्यावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 19:19 IST2025-01-30T19:18:29+5:302025-01-30T19:19:02+5:30
फुरसुंगीतील पाॅवर हाऊसजवळ भरधाव मालवाहू कंटेनरने कारला जोरदार धडक दिल्याने अपघातात चालक गंभीर जखमी झाले होते

भरधाव कंटेनरच्या धडकेत कारचालक तरुणाचा मृत्यू; हडपसर - सासवड रस्त्यावरील घटना
पुणे: भरधाव कंटेनरच्या धडकेत कारचालक तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना हडपसर-सासवड रस्त्यावर घडली. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अक्षय बाळासाहेब चिव्हे (वय ३१, रा. संयाेग काॅलनी, काळेपडळ आणि अपेक्षा लाॅनजवळ, फुरसुंगी, पाॅवर हाऊसजवळ, फुरसुंगी, सासवड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत बाळासाहेब महादेव चिव्हे (वय ५९, रा. संयोग काॅलनी, काळेपडळ, हडपसर) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
अक्षय यांचे हडपसर भागातील काळेपडळ परिसरात मोबाइल विक्रीचे दुकान आहे. बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास अक्षय हडपसर-सासवड रस्त्यावरून कारमधून घरी निघाले होते. त्या वेळी फुरसुंगीतील पाॅवर हाऊसजवळ भरधाव मालवाहू कंटेनरने कारला जोरदार धडक दिली. अपघातात चालक अक्षय गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या अक्षय यांचा उपचारांपूर्वीच मृत्य झाल्याची माहिती काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव तपास करत आहेत.