मुंबई-बंगळुरू महामार्गावर रस्ता ओलांडताना वाहनाने उडवले, तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 01:55 PM2024-06-03T13:55:21+5:302024-06-03T14:06:23+5:30
मुंबई-बंगळुरू महामार्गावरील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलासमोरील बस थांब्याजवळ शुक्रवारी (दि. ३१) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली....
पिंपरी : रस्ता ओलांडत असलेल्या तरुणाला भरधाव वाहनाने धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. मुंबई-बंगळुरू महामार्गावरील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलासमोरील बस थांब्याजवळ शुक्रवारी (दि. ३१) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.
मो. एहेतसाम अन्सारी फखरुद्दीन अन्सारी (वय २७) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मोहम्मद एहसान अन्सारी फखरल हसन (३२, रा. मंगळवार पेठ, जुना बाजार, पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. तुकाराम विठ्ठल वाशिवले (२७, रा. वाशिवीली, ता. वाई, जि. सातारा) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एहसान व त्यांचा भाऊ मो. एहेतसाम, तसेच त्यांच्या गावातील मोहम्मद इरफान व मोहम्मद तन्वीर हे नेहमीप्रमाणे केटरिंगचे काम असल्याने बालेवाडीतील क्रीडा संकुल येथे आले होते. त्यांचे काम संपवून ते घरी जाण्यासाठी निघाले असता, एहेतसाम हे गाडी पकडण्यासाठी रस्त्याच्या पलीकडील बस थांब्याकडे पायी जात होते. दरम्यान, रस्ता ओलांडत असताना, संशयिताच्या भरधाव वाहनाने एहेतसाम यांना जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.