लोणावळ्याची घटना ताजी असतानाच ताम्हिणी घाटात तरुण बुडाला, VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 02:26 PM2024-07-01T14:26:12+5:302024-07-01T14:28:13+5:30

ताम्हिणी घाटात गेलेल्या स्वप्नील धावडेने पाण्यात उडी मारल्यानंतर तो जोरदार प्रवाहात बेपत्ता झाला...

A young man drowned in Tamhini Ghat while the Lonavala incident was fresh, VIDEO went viral | लोणावळ्याची घटना ताजी असतानाच ताम्हिणी घाटात तरुण बुडाला, VIDEO व्हायरल

लोणावळ्याची घटना ताजी असतानाच ताम्हिणी घाटात तरुण बुडाला, VIDEO व्हायरल

पुणे : लोणावळ्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना रविवारी (३० जून) घडली होती. ही घटना ताजी असतानाच ताम्हिणी घाटात एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. स्वप्नील धावडे असे वाहून गेलेल्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा तरुण आपल्या जिममधील ३२ जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

ताम्हिणी घाटात गेलेल्या स्वप्नील धावडेने पाण्यात उडी मारल्यानंतर तो जोरदार प्रवाहात बेपत्ता झाला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तो धबधब्यात उडी मारताना दिसत आहे. त्यानंतर तो दगडाला पकडून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला त्यात यश आले नाही. पुढे पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो वाहत गेला.

लोणावळ्यातील घटनेतील चौघांचे मृतदेह सापडले -

सय्यदनगर परिसरात राहणाऱ्या अन्सारी कुटुंबात चार दिवसांपूर्वीच एक विवाह झाला होता. त्यामुळे या नवदाम्पत्यासह घरातील व नातेवाईक लोणावळा येथे फिरण्यासाठी गेले. १७ सीटर बस करून येथून गेलेल्या कुटुंबातील तीन मुली, मुलगा व महिला, असे पाच जण वाहून गेले. नवदाम्पत्य यात वाहून गेले होते, ते वाचले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असून, रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहेत. वाहून गेलेल्यांपैकी चौघांचे मृतदेह बाहेर काढले. रात्र झाल्याने शोधकार्य थांबवले असून, सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू होणार आहे. तळेगाव येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे.

नूर शाहिस्ता अन्सारी (वय ३५), अमिना आदिल अन्सारी (१३), मारिया अन्सारी (७), हुमेदा अन्सारी (६), अदनान अन्सारी (४ वर्षे, सर्व जण रा. सय्यदनगर, हडपसर, पुणे), अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत. येथील पाणी कमी असल्याने ते खडकावर बसले होते. पावसात डोंगरमाथ्यावरून मोठा पाऊस पडल्याने हे पाच जण वाहून गेले. ही घटना दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली. ही घटना हडपसरमध्ये समजताच येथील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

सय्यदनगर येथील मौलाना असणारे सलमान अन्सारी यांच्या दोन मुली, त्यांची मेहुणी व मेहुणीची एक मुलगी आणि मेहुण्याचा एक मुलगा, असे पाच जण या पुरात वाहून गेले. सलमान अन्सारी यांच्या दोन मुली या हांडीवाडी रो येथील शाळेत शिकत होत्या. ही चारही मुले लहान असून, त्यांची मेहुणी नूर अन्सारी ही घरकाम करत होती. तर मेहुणे यांची बेकरी असून, त्यांचाही मुलगा यामध्ये वाहून गेला. या घटनेने सय्यदनगर भागात शोककळा पसरली आहे.

Web Title: A young man drowned in Tamhini Ghat while the Lonavala incident was fresh, VIDEO went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.