माजी आमदार बापूसाहेब पठारेंसोबत फ्लेक्सवर फोटो न लावल्याने तरुणाला मारहाण
By विवेक भुसे | Published: September 29, 2022 04:23 PM2022-09-29T16:23:06+5:302022-09-29T16:25:53+5:30
चौघांनी तरुणावर लोखंडी रॉड, काठ्याने बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली...
पुणे : खराडी गावठाण येथील नवरात्र उत्सवाच्या स्टेजवर माजी आमदार बापूसाहेब पठारे व त्यांच्या फोटोबरोबर आमचे फोटो का लावले नाही, असे म्हणून चौघांनी तरुणावर लोखंडी रॉड, काठ्याने बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी कैलास दत्तात्रय पठारे (वय ४१, रा. खराडी गावठाण)यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजाराम विष्णु पठारे (वय ५२), बाळासाहेब विष्णु पठारे (वय ५८), स्वप्निल बाळासाहेब पठारे (वय २४) आणि सौरव राजाराम पठारे (वय २०, सर्व रा. मुंजाबा चौक, खराडी गावठाण) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार खराडी गावठाणात सोमवारी रात्री सव्वा आठ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कैलास पठारे यांनी खराडी गावठाण येथे साजरा करीत असलेल्या नवरात्र उत्सवाच्या स्टेजचा खर्च केलेला असून त्यावर त्यांनी फ्लेक्स लावला आहे. या फ्लेक्सवर माजी आमदार बापूसाहेब पठारे, महेंद्र पठारे, आपला स्वत:चा तसेच किरण पठारे व सुरेंद्र पठारे यांचे फोटो लावले आहेत. हे पाहून राजाराम पठारे याने माझा भाऊ बाळासाहेब पठारे यांचा फ्लेक्सवर फोटो का लावला नाही, असे विचारले. त्यावर कैलास पठारे याने उत्सवाच्या स्टेजचा खर्च मी स्वत: केलेलो आहे. त्यामुळे फ्लेक्सवर कोणाचा फोटो लावायचा तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे, असे म्हणाले.
तेव्हा राजाराम पठारे याने सौरव पठारे याला घरातून लोखंडी रॉड व लाकडी काठ्या आणण्यास सांगितले. त्या चौघांनी मिळून कैलास पठारे यांना बेदम मारहाण केली. शिवीगाळ करुन सौरव याने तुझा मर्डर करतो, अशी धमकी दिली. कैलास पठारे यांनी उपचार घेतल्यानंतर फिर्यादी दिली असून सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.