परीक्षेला डमी उमेदवार म्हणून बसण्यास नकार दिल्याने तरुणाला मारहाण
By विवेक भुसे | Published: January 14, 2024 04:24 PM2024-01-14T16:24:49+5:302024-01-14T16:25:13+5:30
विद्यार्थ्याने नकार दिल्यावरही आरोपी त्याला जबरदस्तीने परीक्षा हॉलपर्यंत घेऊन गेला
पुणे : इंजिनिअरिंग ग्राफीक्स परिक्षेला आपल्या जागेवर डमी उमदेवार म्हणून बसण्यास नकार दिल्याने एका तरुणाच्या घरात शिरुन त्याला पट्ट्याने बेदम मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा येथील एका २० वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी साहिल राजेंद्र देऊळकर (वय १९, रा. गौरव सोसायटी, कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे सहकारी आहेत. साहिल याची सिंहगड अॅकडमी इंजिनिअरिंग येथे इंजिनिअरिंग ग्राफीक्स परीक्षा १२ जानेवारी रोजी होणार होती. या परिक्षेला साहिल याने फिर्यादीला त्याच्या जागेवर डमी म्हणून बसून परीक्षा देण्यास सांगितले. त्याने नकार दिल्यावरही तो फिर्यादीला जबरदस्तीने परिक्षा हॉलपर्यंत घेऊन गेला. त्याला परीक्षा देण्यासाठी जबरदस्ती करत होता. परंतु, फिर्यादीने त्याला नकार दिला. त्यानंतर फिर्यादी हा कोंढव्यातील घरी आला. साहिल सायंकाळी त्याच्या घरी आला. फिर्यादी यांना कानाखाली, मानेवर पाठीवर मारहाण केली. कमरेचा पट्टा काढून बेदम मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे तपास करीत आहेत.