सुश्रुषेसाठी ठेवलेल्या तरुणाने ज्येष्ठाला बांधून ठेवले; मारण्याची धमकी देऊन ३२ हजारांना लुटले
By नम्रता फडणीस | Updated: January 3, 2025 19:12 IST2025-01-03T19:11:49+5:302025-01-03T19:12:46+5:30
तरुणाने पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, त्यांच्याकडील ३२ हजारांची रोकड आणि मोबाइल संच त्याने काढून घेतला, त्यांचे हात दोरीने बांधून चोरटा पसार झाला

सुश्रुषेसाठी ठेवलेल्या तरुणाने ज्येष्ठाला बांधून ठेवले; मारण्याची धमकी देऊन ३२ हजारांना लुटले
पुणे : ज्येष्ठांच्या सेवा सुश्रुषेसाठी एखाद्या मुलाला किंवा मुलीला ठेवताय, मग नीट विचार करा. सुश्रुषेसाठी ठेवलेल्या कामगाराने यापूर्वी शहरात चोरी, तसेच ज्येष्ठांना लुटल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडली. सेवा सुश्रृुषेसाठी ठेवलेल्या तरुणानेच ज्येष्ठाला दोरीने बांधून त्यांच्याकडील रोकड आणि मोबाइल संच लुटून नेला. ही घटना कोरेगाव भागात घडली. याप्रकरणी पसार झालेल्या तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चिंटू चतुर्वेदी (वय १९, रा. मध्य प्रदेश) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका व्यावसायिकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक घोरपडीतील सोपानबाग परिसरात राहायला आहेत. त्यांचे वडील कोरेगाव पार्क भागातील अग्रसेन सोसायटीत राहातात. त्यांची सुश्रुषा करण्यासाठी आरोपी चतुर्वेदीला ठेवले होते. बुधवारी (दि. १) त्याने ज्येष्ठाला चाकूचा धाक दाखविला. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडील ३२ हजारांची रोकड आणि मोबाइल संच त्याने काढून घेतला. त्यांचे हात दोरीने बांधले. ऐवज लुटून चोरटा पसार झाला. सायंकाळी व्यावसायिक वडिलांची विचारपूस करण्यासाठी घरी गेले. तेव्हा सुश्रुषेसाठी ठेवलेल्या चतुर्वेदीने वडिलांना चाकूच्या धाकाने लुटल्याचे उघडकीस आले. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.