खडकवासला धरणामागे कालव्यात पोहण्यासाठी आलेला तरुण बुडाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 18:56 IST2025-03-15T18:55:56+5:302025-03-15T18:56:16+5:30
तरुणाला पोहता येत नव्हते तरीही पाण्यात उतरला, पाण्याला वेग असल्याने काही क्षणांत तो दिसेनासा झाला

खडकवासला धरणामागे कालव्यात पोहण्यासाठी आलेला तरुण बुडाला
पानशेत: खडकवासला धरणामागे कालव्यात पोहण्यासाठी आलेला तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. गौरव रोशन सिंग (वय 18, सध्या रा. जांभुळवाडी पुणे मूळ रा. बिहार) असे संबंधित तरुणाचे नाव असून याबाबत माहिती मिळताच नांदेड सिटी पोलीस व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे नांदेड सिटी अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. कालव्यात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेला गौरव इतर दोन नातेवाईकांसह आज सुट्टी असल्याने खडकवासला धरणामागे कालव्यात पोहण्यासाठी आला होता. गौरवला पोहता येत नव्हते. इतर दोघे नातेवाईक पोहत असताना गौरव पाण्यात उतरला. परंतु पाण्याला वेग असल्याने काही क्षणांत तो दिसेनासा झाला. इतर दोघांनी आरडाओरड करत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही.
याबाबत माहिती मिळताच नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस स्वतः पोलीस अंमलदार परमेश्वर नरवडे, अमित साळुंखे,शुभम चव्हाण, मनोज खराडे, भिमराज गांगुर्डे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे व विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाचे जवान अतुल रोकडे, परमेश्वर राठोड, शुभम मिरगुंडे, प्रतिक शिरसाठ व राहुल शिरोळे बुडालेल्या गौरवचा शोध घेत आहेत. सध्या पूर्ण क्षमतेने उन्हाळी आवर्तन सुरू असल्याने पाण्याला वेग जास्त आहे. विविध उपकरणांच्या साहाय्याने कालव्यात शोधमोहीम राबवली जात आहे.
सध्या कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलेले आहे. कालव्यात पोहण्यासाठी न उतरण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. - अतुल भोस,वरिष्ठ पोलीस निरिक्षक नांदेड सिटी पोलीस