पोलीस भरती झालेल्या युवकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 11:43 AM2022-11-04T11:43:58+5:302022-11-04T11:44:08+5:30
कसलाही आजार नसताना अचानक हृदयविकाराचा धक्का होऊन थेट मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ
यवत : येथील युवक भानुदास ऊर्फ तुषार नामदेव जाधव याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. तुषार हा पुणे सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्याने दुचाकीवरून जात असताना त्याला अचानक विकाराच्या तीव्र धक्क्याने खाली पडला. जवळच हॉस्पिटल असतानाही उपचार पूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
शरीराने धष्टपुष्ट असणारा तुषार काही वर्षांपूर्वी पोलीस भरती झाला होता. मात्र काही कारणास्तव त्याने प्रशिक्षण दरम्यान नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. आता तो घरीच व्यावसाय करत होता. कसलाही आजार नसताना अचानक हृदयविकाराचा धक्का होऊन थेट मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तुषार याच्या घरी त्याची आई , पत्नी, दोन बहिणी असा परिवार आहे. त्याच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झालेले असून तो एकुलता एक होता. त्याचे लग्न झाले असून त्याला अद्याप आपत्य नव्हते. यामुळे घरातील कर्ता एकमेव पुरुष अशा धक्क्याने गेल्याने मोठी हानी झाली आहे. यवत येथील युवा उद्योजक कुमार जाधव यांचा तो सख्खा चुलत भाऊ होता.