Pune: डेटिंग ॲपवरून ओळख, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला २७ लाखांना फसवले
By भाग्यश्री गिलडा | Published: January 31, 2024 05:22 PM2024-01-31T17:22:45+5:302024-01-31T17:25:02+5:30
याबाबत हरशीत कुमार राय (वय २८, रा. उत्तर प्रदेश) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
पुणे : ऑनलाइन डेटिंग ॲपवरून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची तब्बल २७ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत हरशीत कुमार राय (वय २८, रा. उत्तर प्रदेश) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, वडगाव शेरी परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणीने मंगळवारी (दि. ३०) फिर्याद दिली आहे. हा प्रकार मार्च २०२३ ते जानेवारी २०२४ पर्यंत घडला आहे. आरोपी हरशीत आणि फिर्यादी तरुणी यांची ओळख हॅपन या ऑनलाइन डेटिंग ॲपवरून झाली. त्यानांवर दोघांमध्ये संभाषण सुरू झाले. त्यांच्यात मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्याने हरशीत राय याने वेगवेगळी कारणे सांगून तरुणींकडून २७ लाख रुपये घेतले. यानंतर तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता, त्याने लग्न करण्यास नकार दिला, तसेच याबाबत घरच्यांना सांगितले. ‘तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकीन’ अशी धमकी दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नांगरे करत आहेत.