खड्ड्यात दुचाकी कोसळून युवती ठार तर दोन गंभीर जखमी; संतप्त नागरिकांकडून रस्ता रोको
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 20:10 IST2025-01-06T20:07:19+5:302025-01-06T20:10:09+5:30
नीरा : पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील नीरा लोणंद परिसरात खड्ड्यात मोटारसायकल कोसळून युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर ...

खड्ड्यात दुचाकी कोसळून युवती ठार तर दोन गंभीर जखमी; संतप्त नागरिकांकडून रस्ता रोको
नीरा : पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील नीरा लोणंद परिसरात खड्ड्यात मोटारसायकल कोसळून युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. माणिक सोना पेट्रोल पंपासमोर महामार्गावरील खड्ड्यामुळे यापूर्वी अनेक अपघात झाले आहे. या अपघातातमृत्यू झालेल्या युवतीचे नाव अंकीता धायगुडे (वय २०) आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. ०६) रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास माणिक सोना पेट्रोल पम्प जवळ बाळूपाटलाचीवाडी येथील तिघेजण मोटार सायकल वरून जात असतांना त्यांनी मोटारसायकल खड्ड्यात कोसळली. यावेळी अंकिता अनिल धायगुडेचा जागीच मृत्यू झाला. तर चालक विशाल दौलत धायगुडे (वय २७), सानिका विलास धायगुडे ( वय १८ ) हे दोघे गंभीर जखमी झाले आहे.
पालखी मार्गावरील लोणंद ते नीरा दरम्यान रस्त्यात लोणंद नागरपंचायतच्या पाणी लाईनचे दुरुस्तीचे काम चालू होते. सदर ठिकाणी ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारचे बॅरीगेटस् किंवा अडथळा उभारला नसल्याने या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे रस्त्यावरच असणारा हा खड्डा वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. यामुळे हा अपघात घडला असल्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
या अपघातानंतर बाळूपाटलाचीवाडी येथील ग्रामस्थांनी लोणंद येथील राजमाता अहिल्यादेवी चौक येथे सुमारे अर्धा तास अडवून धरत दोषींवर गुन्हा दाखल करून कडक कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळेस लोणंद पोलीस स्टेशनचे स.पो.नि. सुशील भोसले यांनी रास्ता रोको करणाऱ्यांची समजूत काढत त्यांना लोणंद पोलीस स्टेशन येथे बोलावण्यात आले. या प्रकरणी संबंधितांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम ऊशीरा पर्यंत चालू होते.