Pune: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, तरुणावर गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Updated: December 25, 2023 16:12 IST2023-12-25T16:10:53+5:302023-12-25T16:12:30+5:30
याप्रकरणी नांदेड जिल्ह्यातील वसमत येथील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Pune: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, तरुणावर गुन्हा दाखल
पुणे : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यातील एका तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास स्वत: आत्महत्या करण्याची धमकी पीडित तरुणीला दिली. याप्रकरणी नांदेड जिल्ह्यातील वसमत येथील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हवेली तालुक्यातील चऱ्होली बुद्रुक येथील २५ वर्षीय तरुणीने रविवारी (दि. २४) लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून विश्वनाथ कुमराव काळे (३०, रा. वसमत जि. नांदेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विश्वनाथ काळे याने तरुणीसोबत ओळख केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तरुणीला मोशी येथील मित्राच्या घरी, दिघी आणि डेक्कन येथील लॉजवर नेले. तसेच हैदराबाद येथे नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच याबाबत पोलिसांकडे तक्रार केली तर स्वत:च्या जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी तरुणीला दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पवार या करत आहेत.