पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकाचा वीज पडून मृत्यू; कुटुंबावर शोककळा, इंदापूरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 12:13 PM2023-03-08T12:13:25+5:302023-03-08T12:13:38+5:30
युवकाला दोन बहिणी असून तो कुटुंबात एकुलता एक होता
इंदापूर : काटी गावच्या हद्दीतील भरतवाडी येथे मंगळवारी रात्री सहा वाजण्याच्या सुमारास वीज पडून शेतात काम करत असणा-या २२ वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला. ओंकार दादाराम मोहिते (रा. भरतवाडी,काटी,ता. इंदापूर) असे त्या युवकाचे नाव आहे. त्याचे चुलते तुकाराम भिवा मोहिते यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तुकाराम मोहिते शेतातील काम करुन घरी येत होते. त्यांचा चुलत पुतण्या ओंकार मोहिते हा त्यांच्या शेतातील मक्याच्या पिकाला पाणी देत असताना त्यांना दिसला. वादळी वा-यासह पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यामुळे त्यांनी ओंकारला घरी चल पाऊस येईल असे सुचवले. परंतू तुम्ही पुढे जा. तुमच्या पाठीमागे मी घरी येतो, असे ओंकार म्हणाला. मोहिते घरी आले. त्याच वेळी अचानक मोठ्याने विज कडाडल्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी घराबाहेर येवून पाहिले असता त्यांच्या भावकीतील एक जणाच्या शेताचे बांधावर असलेल्या नारळाच्या झाडाने पेट घेतल्याचे त्यांना दिसले. त्यावेळी मोहिते,ओंकारचे वडील व इतर जण धावत शेतात गेले असता, ओंकात शेतात निपचित पडलेला दिसला. त्याला उपचारासाठी दवाखान्यात आणण्यात आले. त्याला तपासून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दादाराम मोहिते यांना दोन मुली आहेत. ओंकार हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. तो पोलीस भरतीची तयारी करत होता. अत्यंत उत्साही अशा युवकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. चुलत्याचे ऐकून तो रानातून घरी आला असता तर त्याचे प्राण वाचले असते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.