Pune: नाना पेठेतील टोळी युद्धात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू
By नितीश गोवंडे | Published: October 5, 2023 05:04 PM2023-10-05T17:04:02+5:302023-10-05T17:04:42+5:30
याप्रकरणी समर्थ पोलिसांनी गुंड बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या ६ साथीदारांना अटक केली असून, ३ अल्पवयीन साथीदारांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे...
पुणे : वर्चस्वाच्या वादातून भरदिवसा नाना पेठेत दोन जणांवर आंदेकर टोळीच्या टोळक्याने हातोडा आणि कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना सोमवारी (२ ऑक्टोबर) दुपारी सव्वा चारच्या सुमारास घडली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या निखिल आखाडे (२९, रा. धनकवडी) याच्यावर २५ ते २६ वार झाले होते. उपचारादरम्यान निखिलचा मृत्यू झाला असून, त्याचा मित्र अनिकेत दुधभाते (२७) याच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी समर्थ पोलिसांनी गुंड बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या ६ साथीदारांना अटक केली असून, ३ अल्पवयीन साथीदारांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंड सोमनाथ गायकवाड सध्या येरवडा करागृहात आहे. त्याच्या टोळीतील सदस्यांचा आंदेकर टोळीसोबत वर्चस्वाचा जूना वाद आहे. सोमवारी संध्याकाळी निखिल आणि अनिकेत दोघे गणेश पेठेतील शितळादेवी मंदिर चौकातून अशोक चौकाकडे जात असताना, आंदेकर टोळीतील सदस्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर भररस्त्यात हल्ला केला.
या हल्ल्यात निखिल आणि अनिकेत गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर आरोपींनी शस्त्रे फिरवत बंडु आंदेकर पुण्याचा भाई आहे, असे म्हणत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान निखीलचा गुरूवारी पहाटे मृत्यु झाला. न्यायालयाने आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, पुढील तपास समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे करत आहेत.